Axar Patel breaks MS Dhoni Record: तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलीय. त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दोन विकेट्सनं विजय मिळवला. भारताच्या विजयात अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं (Axar Patel) महत्वाची भूमिका बजावली. अक्षरनं मोक्याच्या वेळी वादळी खेळी करत निकाल भारताच्या बाजूनं झुकवला. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. या कामगिरीसह अक्षर पटेलनं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडीत काढलाय. 


35 चेंडूत 64 धावांची वादळी खेळी 
वेस्ट इंडीजविरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या अक्षर पटेलनं फक्त 35 चेंडूत 64 धावांची वादळी खेळी केली. ज्यात पाच षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. त्यानं 182 स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. अक्षर पटेल आणि दीपक हुडा यांनी 33 चेंडूत 51 धावांची भागेदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.


अक्षर ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार
या सामन्यात भारताला अखेरच्या 10 षटकात 100 धावांची आवश्यकता होती. परंतु, भारताकडून क्रीजवर उभा असलेला अक्षर पटेल वेगळ्याच अंदाजात फलंदाजी करत होता. या सामन्यातील अखेरच्या षटकात भारताला 8 धावांची गरज होती. या षटकातील पहिल्या दोन चेंडूत दोन धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूत अक्षर पटेलनं षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. 


धोनीचा कोणता विक्रम मोडला?
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सातव्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता. त्यानं 2005 मध्ये झिम्बॉव्वेविरुद्ध तीन षटकार ठोकले होते. याशिवाय, युसूफ पठाणनंही सातव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्ध एकाच डावात तीन षटकार मारले होते. त्यानंतर अक्षर पटेलनं वेस्ट इंडीजविरुद्ध सातव्या क्रमांकावर पाच षटकार ठोकत विक्रमाला गवसणी घातली. 


हे देखील वाचा-