WI Vs IND 3rd ODI: वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (West Indies vs India) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 नं आघाडी घेतलीय. या मालिकेतील अखेरचा सामना उद्या (27 जुलैला) त्रिनिदादच्या (Trinidad) क्वीन्स पार्क ओव्हल (Queen's Park Oval) येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताचा वेस्ट इंडीजच्या संघाला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न असेल. वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतानं आतापर्यंत एकदाही वेस्ट इंडीजच्या संघाला त्यांच्या मायभूमीवर क्लीन स्वीप दिला नाही. परंतु, शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात भारतीय संघ वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देऊन इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय. 


क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतानं वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीवर अनेकदा पराभूत केलंय. परंतु, अद्यापही भारताला वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीवर क्लीन स्वीप देता आलं नाही. यामुळं तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्याच्या उद्देशानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारताच्या वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी भारत आणि वेस्ट इडीज यांच्यात आतापर्यंत 9 एकदिवसीय सामने खेळले गेले. यातील पाच सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, वेस्ट इडींजच्या संघानं चार सामने जिंकले आहेत. 


भारताचं सर्वोत्तम प्रदर्शन
भारतानं 2017 मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यात पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं वेस्ट इंडीजचा 3-1 असा पराभव केला होता. हे भारतीय संघाचं सर्वोत्तम प्रदर्शन होतं. भारत पहिल्यांदा 1893 मध्ये एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी  वेस्ट इंडीजला गेला होता. तेव्हापासून भारताला वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देता आलं नाही. 


वेस्ट इंडीजविरुद्ध सलग बाराव्यांदा एकदिवसीय मालिका जिंकली
भारतानं 2007 पासून वेस्ट इंडीजविरुद्ध एकही मालिका गमावली नाही. दरम्यान, 2007 पासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आतापर्यंत 11 मालिका खेळल्या गेल्या आहेत. तर, सध्या बारावी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून भारतानं मालिका खिशात घातलीय. या मालिकेतील अखेरचा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाईल. म्हणजेच भारतानं वेस्ट इंडीजविरुद्ध सलग 12 मालिका जिंकल्या आहेत. 


हे देखील वाचा-