ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानत आयसीसी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पीसीबीने टीम इंडियाला त्यांच्या देशात आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत त्यांचे सर्व सामने हायब्रिड मॉडेल अंतर्गत यूएईमध्ये खेळेल. पण, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानला जावे लागू शकते.


2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हायब्रिड मॉडेल लागू केले असले तरी, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानला जावे लागू शकते. मनोरंजक गोष्ट अशी आहे की, बीसीसीआय पण काही करू शकत नाही. शेवटी, यामागील मोठे कारण काय आहे? ते जाणून घेऊया...


रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार?


खरंतर, कोणत्याही आयसीसी स्पर्धेपूर्वी सर्व संघांच्या कर्णधारांना अधिकृत कार्यक्रमात उपस्थित राहणे अनिवार्य असते आणि हा कार्यक्रम नेहमीच यजमान देशात होतो. जरी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जाईल आणि भारत त्यांचे सामने दुबईमध्ये खेळेल, तरी पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व कर्णधार ट्रॉफीसोबत फोटोशूट देखील करतात. आयसीसीच्या या परंपरेमुळे रोहित शर्माला पाकिस्तानला जावे लागू शकते. पण, भारतीय कर्णधार पाकिस्तानला जाणार की नाही हे अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेले नाही.


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार?


2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या बहुतेक देशांनी त्यांच्या संघाची घोषणा केली आहे. परंतु बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. सोमवारी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माहिती दिली की संघ निवड 18 किंवा 19 जानेवारी रोजी होऊ शकते.


8 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेत 8 टॉप क्रमांकाचे संघ सहभागी होतील. या संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. भारताचा अ गटात समावेश आहे, जिथे त्यांचा सामना बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडशी होईल. दुसऱ्या गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफीचा गतविजेता पाकिस्तान  


इंग्लंडमध्ये शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये झाली होती. भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला जिथे त्याला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होती.


हे ही वाचा -


BCCI New Guidelines : रोहित-कोहलीला बायकोसोबत जास्त वेळ राहता येणार नाही; BCCI चे टीम इंडियाच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध, जाणून घ्या नियम