Hardik Pandya Team India: गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) चर्चा सुरु आहे. घटस्फोटपासून टीम इंडियाचा (Team India) टी-20 संघाचा कर्णधार न बनवणे, यावरुन हार्दिक पांड्या सतत चर्चत आहे. 18 जुलै रोजी बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी वन-डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. यामध्ये वन-डे मालिका रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात येणार आहे. तर टी-20 मालिका सू्र्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात येणार आहे. टी-20 फॉरमॅटची धूरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र सूर्यकुमार यादवची वर्णी लागल्याने सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला. हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवण्यामागे त्याचं फिटनेस असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे.
नेमकं कारण काय?
टीमचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टी-20 चा कर्णधार बनवण्यासाठी हार्दिक पांड्याच्या बाजूने नव्हते. हार्दिकने 2022 आणि 2023 मध्ये गुजरात टायटन्सची कमान हाती घेतली होती. 2022 मध्ये हार्दिकने गुजरातला चॅम्पियन बनवले होते आणि त्यानंतर 2023 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात उपविजेता ठरला होता. मात्र 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या फ्लॉप ठरला, त्यामुळे त्याला कर्णधारपदासाठी बढती देण्यात आली नाही, असं समोर आलं आहे.
मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा पहिला दौरा-
टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नियुक्ती करण्यात आली. आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वन-डे मालिका गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी अशा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, ज्यांची कदाचित कोणालाच अपेक्षा नव्हती.
शुभमन गिल उपकर्णधार-
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने झिम्बाब्वेचा मालिकेत 4-1 असा पराभव केला. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिलचे उपकर्णधार होणे चर्चेचा विषय बनले आहे. शुभमन गिल अवघा 24 वर्षांचा असून संघात त्याच्यापेक्षा अनुभवी खेळाडू आहेत. सूर्यकुमारला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 संघाचे कर्णधारपद दिले असते, तरीही हार्दिकला उपकर्णधार बनवता आले असते, अशी चर्चा सुरु आहे.
टी20 मालिकेसाठी टीम इंडिया -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज