मुंबई : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर अलिकडे एका माजी क्रिकेटपटूने आरोप केले होते. टीम इंडियाचा खेळाडू मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने विराट कोहलीवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. शमी म्हणाला की, अनेक माजी क्रिकेटपटूंना माहित आहे की, ते जेव्हाही विराट कोहलीविरुद्ध काही बोलतात तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांचं नाव वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर येतं, त्यामुळे ते हेडलाइन्समध्ये येण्यासाठी मुद्दाम असं करतात.


कोहलीवर टीका करणाऱ्यांवर भडकला मोहम्मद शमी


अलिकडेच विराट कोहलीबद्दल एका माजी क्रिकेटपटूने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्रा याने म्हटलं होतं की, प्रसिद्धी मिळाल्यापासून विराट कोहलीच्या वागणुकीत बदल झाला आहे. आता मोहम्मद शमीने कोहलीबद्दल केलेल्या वक्तव्याचा संदर्भ चाहते अमित मिश्राच्या टीकेशी लावत आहेत. शमीचं हे वक्तव्य अमित मिश्रावर निशाणा असल्याचं बोललं जात आहे.


'हेडलाईन्समध्ये राहण्यासाठी जाणून-बुजून कोहलीविरोधात वक्तव्य'


मोहम्मद शमी अलीकडेच एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं. या पॉडकास्टमधील शमीचं वक्तव्य सध्या व्हायरल झालं आहे. शमी म्हणाला की, अनेक माजी क्रिकेटपटूंना माहित आहे की, जेव्हा ते विराट कोहलीच्या विरुद्ध काही बोलतात, तेव्हा त्यांचं नाव वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर दिसेल. चाहत्यांनी या वक्तव्याला अमित मिश्राशी जोडलं आहे. शमीचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.


गेल्या काही वर्षांत कोहली बदलला : अमित मिश्रा


विराट कोहलीवर आरोप केल्यामुळे अमित मिश्रा चर्चेत आला . मिश्रा म्हणाला होता की, गेल्या काही वर्षांत कोहली बदलला आहे आणि तो पूर्वीसारखा राहिलेला नाही. मिश्राने रोहित शर्माचं उदाहरण देत सांगितलं होतं की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा अजूनही तसाच आहे आणि तो त्याच्यासोबत एखादा विनोद करु शकतो, पण तो कोहलीसोबत असं करू शकत नाही.


प्रसिद्धी आणि पॉवरमुळे कोहली व्यक्ती म्हणून बदलला


मिश्राने पुढे म्हटलं की प्रसिद्धी आणि पॉवर यामुळे कोहली एक व्यक्ती म्हणून बदलला आहे. वरिष्ठ असूनही गौतम गंभीरनेच विराट कोहलीसोबतचं भांडण संपवलं, असा दावाही मिश्राने केला. विराट कोहलीने पॅच-अप करायला हवं होतं. आयपीएल 2023 मध्ये विराह कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेचा मुद्दा बनला होता. त्यानंतर, आयपीएल 2024 दरम्यान दोघांनी एकमेकांना मिठी मारुन वाद संपवला.