IND vs AFG : टी20 विश्वचषकातील साखळी फेरीतील सामने संपले आहेत. आता सुपर 8 चा थरार रंगणार आहे. 20 संघापैकी 8 संघ सुपर 8 साठी पात्र ठरले आहेत. भारतीय संघासोबत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया हे संघ अ ग्रुपमध्ये आहेत. सुपर 8 मधील भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानसोबत 20 जून रोजी होणार आहे. पण या सामन्यात पावसाने खोडा घातला तर काय? असा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पडला असेल. कारण, साखळी फेरीमध्ये काही सामने पावसामुळे प्रभावित झाले होते. आता सुपर 8 मध्ये पावसाने खोळंबा घातला तर काय होणार? 


20 जून रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सुपर 8 मधील लढत होणार आहे. हा सामना ब्रिजटाउनमधील केनसिंगटन ओव्हल मैदानात पार पडणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ब्रिजटाउनमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी सामन्याच्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर पावसामुळे भारत आणि अफगाणिस्तान हा सामना रद्द झाला तर काय होणार ? 


सुपर 8 स्टेज नॉकआऊट स्टेज आहे का ?


टी20 विश्वचषकात 20 संघ सहभागी झाले होते. या संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक ग्रुपमधील टॉप 2 संघ सुपर 8 साठी पात्र ठरले. सुपर 8 चे सामने आता सुरु झाले आहेत. सुपर 8 फेरी म्हणजे नॉकआऊट नाही. 


सुपर 8 साठी दोन ग्रुपमध्ये प्रत्येकी चार चार संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक संघ ग्रुपमधील इतर तीन संघासोबत भिडणार आहे. दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर... अ ग्रुपमधून भारताने तिन्ही सामने जिंकल्यास सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे. तर दोन सामने जिंकणारा अथवा जास्त गुण असणारा दुसरा संघही सेमीफायनलमध्ये पोहचेल. याचप्रमाणे ब गटातही होईल. म्हणजे, अ आणि ब गटातील आघाडीचे दोन दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. 


भारत-अफगानिस्तान सामन्यात पावसाने खोळंबा घातला तर ?


20 जून रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक अंक दिला जाईल. हा एक गुण दोन्ही संघासाठी फायद्याचा ठरु शकतो अन् धोक्याचाही ठरु शकतो. 


उदाहरण म्हणून पाहूयात, इंग्लंडचा स्कॉटलंड सोबतचा ग्रुप स्टेजमधील सामना रद्द करण्यात आला होता, त्यानंतर सुपर-8 साठी पात्र होणे त्यांच्यासाठी खूप कठीण झाले होते. स्पष्ट शब्दात समजून घ्यायचे झाले तर भारत-अफगाणिस्तान सामन्यातून कोणताही संघ पावसामुळे बाहेर पडणार नाही, कारण हा बाद फेरीचा टप्पा नाही.


भारताचे सुपर 8 मधील सामने कसे असतील - 


20 जून - भारत विरुद्ध अफगाणिस्तान


22 जून - भारत विरुद्ध बांगलादेश


24 जून - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया