Haris Rauf Viral Video : पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांसोबत वाद करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर चाहत्यांकडून पाकिस्तानी खेळाडूंना हूटिंग केले जातेय. त्यामुळे चवताळलेल्या हॅरिस रौफ हा चाहत्यावरच धावून केला.
हॅरिस रौफ याचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ अमेरिकेतील आहे. व्हिडिओमध्ये हॅरिस रौफ एका चाहत्याच्या अंगावर धावून जाताना दिसतोय. हॅरिस रौफला हा चाहता काहीतरी म्हणतो, ज्यानंतर तो चाहत्याच्या अंगावर धावून जातो. यावेळी त्याची चाहत्यासोबत बाचाबाची देखील होते. 'तू इंडियन होगा' असे म्हणत हॅरिस रौफ त्या चाहत्याच्या अंगावर धावून जातो. त्याची पत्नीला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो हात झटकत चाहत्याच्या अंगावर धावून गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसतेय. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी हॅरिस रौफ याला थांबवले, पण त्यांच्यामधील बाचाबाची मात्र सुरु राहिली.
तू इंडियन होगा... असे म्हणत हॅरिस रौफ यानं त्या चाहत्याला खडसवण्याचा प्रयत्न केला. पण त्या चाहत्यानं मी भारतीय नाही, तर पाकिस्तानी असल्याचं उत्तर देत आपली नाराजी व्यक्त केली. विश्वचषकात पाकिस्तान संघाने अतिशय सुमार कामगिरी केली, साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले, त्यामुळे चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागता आहे.
2024 टी20 विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी फारच खराब राहिली. गतवेळचा उपविजेता पाक संघ यंदा सुपर 8 मध्येही पोहचू शकला नाही. यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर मायदेशात जोरदार टीका होत आहे. अनेक माजी खेळाडूंनी तर कर्णधार बाबर आझमसह संघातील स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली आहे. हॅरिस रौफ आणि चाहत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. हॅरिस रौफ यानं त्या पाकिस्तानी चाहत्याचा बापही काढला. हॅरिस रौफ यानं घातलेला राडा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ
विश्वचषकातील पाकिस्तानची कामगिरी -
अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तान संघाला चार सामन्यात दोन पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिका आणि भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानला दुबळ्या कॅनडा आणि आयर्लंडविरोधात विजय मिळवता आला. आयर्लंडविरोधातही पाकिस्तानचा विजय रडतखडतच झाला.