India beat UAE by 9 wickets Asia Cup 2025 : भारतीय संघाने आशिया कप 2025 ची सुरुवात विजयाने केली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाला यूएईविरुद्ध एकतर्फी विजय मिळाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना यूएईचा डाव फक्त 57 धावांवर संपला. भारताविरुद्ध टी-20 इतिहासातील हा सर्वात कमी धावसंख्या आहे. प्रत्युत्तर, भारतीय संघाने पाचव्या षटकातच 9 विकेट्सने सामना जिंकला. भारताने 93 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चेंडू शिल्लक असताना भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. याच मैदानावर टीम इंडियाने 2021 मध्ये 81 चेंडू शिल्लक असताना स्कॉटलंडचा पराभव केला होता. यावेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमारने खेळाडूंचे कौतुक केले.
टीम इंडियाचा विजयाने श्रीगणेशा झाल्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्हाला आधी विकेट कशी आहे ते पाहायचं होतं. दुसऱ्या डावातही तीच स्थिती राहिली. पण पोरांकडून चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अलीकडे बऱ्याच खेळाडूंनी येथे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली होती, विकेट दिसायला चांगली होती. पण प्रत्यक्षात थोडी संथ होती, त्यामुळे फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली. इथे आत्ता प्रचंड उष्णता आहे, तरीही कुलदीपने चांगली कामगिरी केली आणि त्याला हार्दिक, दुबे आणि बुमराहकडून छान साथ मिळाली.
अभिषेकबद्दल सूर्या काय म्हणाला?
सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, तो सध्या जगातला क्रमांक एकचा फलंदाज आहे, त्याचं कारणही स्पष्ट आहे. तो सुरुवातीपासून टोन सेट करतो, मग आपण 200 धावांचा पाठलाग करू किंवा 50 धावांचा, त्याचा खेळ अविश्वसनीयच असतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सगळे खेळाडू उत्सुक आहेत.
कुलदीप यादवने मोडले कंबरडे
टॉस गमावून आधी फलंदाजीला उतरलेल्या यूएईने सुरुवात चांगली केली होती. सुरुवातीला त्यांच्या टॉप ऑर्डरने चांगली सुरुवात केली. एक वेळ अशी होती की यूएईचा स्कोर 2 बाद 47 धावा होता. पण त्यानंतर चित्र पालटले. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतू लागले. कुलदीप यादवने एका ओव्हरमध्ये तीन बळी घेत यूएई संघाचे कंबरडे मोडले. शेवटच्या 10 धावांमध्ये तब्बल 8 फलंदाज गारद झाले आणि संपूर्ण संघ फक्त 57 धावांत आटोपला.
यूएईकडून अलीशान शराफू (22) आणि मोहम्मद वसीम (19) एवढेच दोन फलंदाज दुहेरी आकड्यात पोहोचले. भारतीय गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने 2.1 षटकांत फक्त 7 धावा देत 4 बळी घेतले. शिवम दुबेनं 2 षटकांत 4 धावा देत 3 बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.
भारताचा विजयी धडाका
लहान लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने वेळ दवडला नाही. अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्याने 16 चेंडूत 30 धावा झळकावल्या. पण लगेच सूर्यकुमार यादव मैदानात उतरला आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. अखेर पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर शुभमन गिलनं चौकार मारत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला.
हे ही वाचा -