India vs UAE Asia Cup 2025 : आशिया कप 2025 टी-20 स्पर्धेला भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. ग्रुप-ए मधील पहिल्या सामन्यात भारताने संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) सहज पराभव करत गुणतालिकेत आपले खाते उघडले. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने हा सामना जिंकण्यासाठी भारताला एक छोटे लक्ष्य दिले होते, जे एकतर्फी केले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सर्वांगिण कामगिरी करत एकतर्फी लढतीत विजय मिळवला.
भारताच्या फिरकीपुढे धुळीस मिळाली संपूर्ण यूएईची टीम
आशिया कपमधील दुसऱ्या सामन्यात यूएईचा संघ पहिल्यांदा फलंदाजीला उतरला. कर्णधार मोहम्मद वसीम आणि शराफू यांनी दमदार सुरुवात करून पहिले दोन षटके गाजवले. चौथ्या षटकात मात्र जसप्रीत बुमराहने शराफूला बोल्ड करून भारताला पहिलं यश मिळवून दिलं. शराफूने 22 धावा केल्या. यानंतर पाचव्या षटकात वरुण चक्रवर्तीने जोहैबला माघारी धाडलं. पाच षटकांनंतर यूएईचा स्कोर 32-2 असा झाला.
मोहम्मद वसीमकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्याआधीच कुलदीप यादवने फिरकीच्या जाळ्यात यूएईला गुंतवलं. त्याने एकामागून एक गडी बाद करत यूएईची पाठ मोडली. कुलदीपनंतर शिवम दुबेनेही गोलंदाजीमध्ये कहर केला. अखेर संपूर्ण यूएई संघ केवळ 57 धावांवर गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने 4 बळी टिपले, तर शिवम दुबेने 3 गडी बाद केले.
31 धावांत 10 विकेट
यूएई संघाची पहिली विकेट 26 धावांवर पडली होती, पण येथून विकेट पडण्याची प्रक्रिया अशा प्रकारे सुरू झाली की, संघाने 31 धावांत सर्व 10 विकेट गमावल्या. टी-20 सामन्यात यूएईला सर्वात कमी धावसंख्यापर्यंत रोखणारा भारत हा देश बनला आहे. यापूर्वी, यूएईचा टी-20 मध्ये सर्वात कमी धावसंख्या 62 धावा होती, जी त्यांनी 2024 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध केली होती. पण आता टीम इंडियाने यूएईला सर्वात कमी धावसंख्या (57 धावा) पर्यंत रोखले आहे.
27 चेंडूत लक्ष्याचा पाठलाग
भारताला हा सामना जिंकण्यासाठी फक्त 58 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सुरुवातीपासूनच आक्रमक अंदाज होता. सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी दमदार फलंदाजी करत विजय निश्चित केला. अभिषेक शर्माने 15 चेंडूत 30 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याच वेळी, शुभमन गिलने 8 चेंडूत 16 धावांची नाबाद खेळी केली.त्यानंतर सूर्यकुमार यादवनेही आकर्षक खेळी करत संघाला विजयी किनाऱ्यावर पोहोचवले. ज्यामुळे भारताने हे लक्ष्य फक्त 4.3 षटकात 1 गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने आशिया कप मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली असून पुढील सामन्यांतही संघाकडून अशीच कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे ही वाचा -