VVS Laxman Indian Team Head Coach South Africa Tour : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. जिथे भारत आणि आफ्रिका संघात टी-20 मालिका होणार आहे. ही मालिका 8 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. याआधी एक मोठी माहिती समोर येत आहे की या दौऱ्यात गौतम गंभीर नाही तर व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत जाणार आहे.




टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल


व्हीव्हीएस लक्ष्मणला भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवले जाणार आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण, वृत्तांवर विश्वास ठेवला तर, 8 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बीसीसीआयने टीम इंडियाची जबाबदारी माजी भारतीय दिग्गज व्हीव्हीएसकडे सोपवली आहे.


साईराज बाहुतुले, हृषिकेश कानिटकर आणि सुभदीप घोष यांसारखे बंगळुरूमधील एनसीएमध्ये काम करणारे कर्मचारी आणि इतर प्रशिक्षक लक्ष्मणच्या कोचिंग स्टाफचा भाग असतील. बाहुतुले (मुख्य प्रशिक्षक), कानिटकर (फलंदाजी प्रशिक्षक) आणि घोष (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) हे ओमान येथे झालेल्या आशिया इमर्जिंग कप स्पर्धेत सहभागी झालेल्या इंडिया इमर्जिंग संघाचा भाग होते.


गौतम गंभीर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर का नाही जाणार?


आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, गौतम गंभीरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर का पाठवले जात नाही? खरंतर, पुढील महिन्याच्या 10 तारखेच्या सुमारास बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाताना दक्षिण आफ्रिकेत जाणे गंभीरला शक्य नाही. त्यामुळे व्हीव्हीएस लक्ष्मणला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासोबत तिथे पाठवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला असावा.


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वेळापत्रक


टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-20 मालिका 8 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना 8 नोव्हेंबरला डर्बनमध्ये तर दुसरा सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. तिसरा आणि चौथा टी-20 सामना अनुक्रमे 13 आणि 15 नोव्हेंबरला होणार आहे.


दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भरतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार, आवेश खान, यश दयाल.  


हे ही वाचा -


Ind vs NZ: रोहित शर्माचा तो विचित्र निर्णय; पराभवासाठी वरिष्ठ खेळाडू जबाबदार, संजय मांजरेकरांनी स्पष्टच सांगितले!