India vs New Zealand, 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत न्यूझीलंडने मालिका जिंकली आहे. तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगणार आहे. 


भारताने 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. यापूर्वी 2012-13 च्या भारत दौऱ्यात इंग्लंडने टीम इंडियाचा कसोटी मालिकेत पराभव केला होता. तेव्हापासून भारतीय संघाचे घरच्या मैदानावर वर्चस्व होते. त्याने सलग 18 मालिका जिंकल्या होत्या, मात्र आता ही विजयी मालिका थांबली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियावर विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. भारतीय संघाचे माजी खेळाडू दिनेश कार्तिक आणि संजय मांजरेकर यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. 






 न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी वरिष्ठ भारतीय खेळाडूंची आहे, असं दिनेश कार्तिकने म्हटलं आहे. तसेच वरिष्ठ खेळाडू नक्कीच जबाबदारी स्वीकारतील. मी संघातील प्रत्येकाला ओळखतो. त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम मालिका नव्हती, असे नक्कीच सांगतील, असं दिनेश कार्तिकने सांगितले. तसेच या पराभवाचे गौतम गंभीरला दोषी ठरवणे चुकीचे आहे, असंही दिनेश कार्तिक म्हणाला. 


संजय मांजरेकर काय म्हणाले?


भारताच्या पराभवानंतर संजय मांजरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या मालिकेत चांगल्या धावा करणाऱ्या सर्फराज खानला खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणे कुठेतरी चुकीचा निर्णय होता. सर्फराझला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे आणि वॉशिंग्टन सुंदरला डावखुरा फलंदाज असल्यामुळे वरच्या क्रमांकावर पाठवणे असे बदल व्हायला नकोत. हा अतिशय विचित्र निर्णय होता. असे निर्णय घेताना रोहित शर्माला सावध राहण्याची गरज आहे. रोहितने खेळाडूची समग्र गुणवत्ता आणि क्षमतेच्या आधारावरच पुढे जायला हवे, असं संजय मांजरेकर यांनी सांगितले.


WTC च्या गुणतालिकेत बदल-


रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पुणे कसोटीपूर्वी 68.06 टक्के गुणांसह WTC गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 61.50 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय 55.56 टक्के गुणांसह श्रीलंका तिसऱ्या, दक्षिण आफ्रिका 47.62 टक्के गुणांसह चौथ्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड 44.44 टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाची गुणांची टक्केवारी 62.82 वर आली आहे.


संबंधित बातमी:


Ind vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव का झाला?; हरभजन सिंगने सांगितलं जिव्हारी लागणारं कारण!