Vishnu Vinod Video : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची अवस्था खुपच खराब राहिली होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 5 वेळचा चॅम्पियन संघ संपूर्ण स्पर्धेत संघर्ष करताना दिसला. त्यामुळे आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा लिलावात फ्रँचायझी आपल्या संघात अनेक मोठे बदल करू शकतो. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत असलेला अनुभवी फलंदाज विष्णू विनोदने केरळ क्रिकेट लीग टी-20मध्ये झंझावाती शतक ठोकले.


30 वर्षांच्या विष्णू विनोदने 32 चेंडूत शतक झळकावून आपल्यात गेम शिल्लक असल्याचे सिद्ध केले आहे. केरळ क्रिकेट लीग टी-20 मध्ये झालेल्या सामन्यात विष्णू विनोदने 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळताना 45 चेंडूत 139 धावा केल्या.


विष्णू विनोदने ठोकले तुफानी शतक


विष्णू विनोद केरळ क्रिकेट लीग टी-20 मध्ये त्रिशूर टायटन्सकडून खेळतो. अलेप्पी रिपलविरुद्धच्या सामन्यात त्याने झंझावाती शतक झळकावून इतिहास रचला. ऋषभ पंतसह तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. पंतने 2018 मध्ये हिमाचलविरुद्ध 32 चेंडूत शतक झळकावले होते. आता विष्णू विनोदनेही तेवढ्याच चेंडूंवर शतक झळकावून मोठी कामगिरी केली. त्याने 45 चेंडूत 139 धावांची स्फोटक खेळी करताना 5 चौकार आणि 17 षटकार ठोकले.


टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम एस्टोनियाच्या साहिल चौहानच्या नावावर आहे. त्याच वर्षी सायप्रसविरुद्ध त्याने 27 चेंडूत शतक झळकावून संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती.




लिलावात पडणार पैशांचा पाऊस?


विष्णू विनोद आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघात होता, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. मुंबई आता त्याला आयपीएल 2025 पूर्वी सोडू शकते. जर तो लिलावात आला तर त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो. विष्णू विनोदने आयपीएलमध्ये आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. त्याची ही विक्रमी खेळी त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरू शकते.


देशांतर्गत क्रिकेटबद्दल बोलायचे तर, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 28 सामने, लिस्ट ए मध्ये 53 आणि टी-20 मध्ये 61 सामने खेळले आहेत. विष्णू विनोदने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1040 धावा, लिस्ट A मध्ये 1773 धावा आणि T20 कारकिर्दीत 1591 धावा केल्या आहेत.


हे ही वाचा -


पाकिस्तान संघाचा माजी प्रशिक्षक टीम इंडियाच्या ताफ्यात; चेन्नईत खेळाडूंना दिलं प्रशिक्षण


पुन्हा 'गंभीर' क्लास; टीम इंडियाचा सराव सुरु, रोहित, कोहलीसह मैदानात कोण कोण दिसले?, Photo's