Virat Kohli Century : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि स्टार बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) याने दमदार असं शतक झळकावत 74 वं आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं आहे. 85 चेंडूत कोहलीनं हे शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षे खराब फॉर्मात असणारा कोहली आता फॉर्मात परतल्यानंतर इतका सूसाट खेळी करत आहे की मागील चार एकदिवसीय सामन्यांत त्यानं तीन शतकं ठोकली आहेत. या शतकासोबत तो महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या 100 शतकांच्या विक्रमाच्या आणखी एक पाऊल जवळ गेला आहे.
विशेष म्हणजे कोहलीचं हे 46 वं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक आहे. सचिनने 49 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकं ठोकल्यामुळे कोहली आता सचिनच्या वन-डे शतकांच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. कोहलीने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटर रिकी पॉंटिंग याला मागे टाकलं होतं. रिकीने 71 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली असून कोहलीच्या नावावर आता 74 शतकं झाली आहेत. सध्या खेळणाऱ्यांमध्ये कोणता खेळाडू कोहलीच्या आसपासही नाही. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 45 शतकांवर असून कोहलीच्या फक्त एकदिवसीय शतकांचा विचार केला तरी तो वॉर्नरच्या पुढे आहे.
भारताची मालिकेत आघाडी
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडियाने यापूर्वीच श्रीलंकेवर 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला हा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश द्यायचा आहे.
हे देखील वाचा-