Virat Kohli On His Captaincy : माजी कर्णधार विराट कोहली सध्या बॉर्डर गावस्कर मालिकेत खेळत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने झालेले आहेत. दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत, पण यामध्ये विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. टी20 आणि वनडे मध्ये विराट कोहली फॉर्मात परतलाय, पण कसोटीमध्ये बॅट अद्याप शांतच आहे. आज आरसीबीची पॉडकास्टमध्ये विराट कोहलीनं अनेक विषयावर भाष्य केलेय. यामध्ये विराट कोहलीने स्वत:च्या कॅप्टनीसवरही वक्तव्य केलेय. तो म्हणाला की, मला अयशस्वी कर्णधार मानलं जात होते.
मला अयशस्वी कर्णधार मानलं जायचं
आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहली म्हणाला की, आपण एखादी स्पर्धा जिंकण्यासाठीच खेळतो. मी 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 विश्वचषक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 आणि 2021 च्या टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचं नेतृत्व केलेय. आपण 2017 च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहचलो होतो. टीम इंडिया 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहचली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचलो होतो, तरिही मला अयशस्वी कर्णधार मानलं जात होतं.
मी कधीच तशा पद्धतीने विचार नाही केला. एक संघ म्हणून आपण जे मिळवलं, जे बदल झाले, ते माझ्यासाठी गर्वाची गोष्ट राहणार आहे. एक स्पर्धा काही वेळासाठी असते, पण संघातील संस्कृती मोठ्या कालावधीपर्यंत राहते. त्यासाठी सातत्य हवं असते, असे कोहली म्हणाला. एक खेळाडू म्हणून मी विश्वचषक जिंकला आहे. एक खेळाडू म्हणून चॅम्पियन ट्रॉफीही जिंकली आहे. मी त्या संघाचाही भाग होतो, ज्यानं विदेशात विजय मिळवला... कसोटी सामने जिंकले... तुम्ही जर विश्वचषक न जिंकणारा म्हणून पाहत असाल तर असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना विश्वचषक जिंकता आला नाही. 2011 मध्ये भारतीय संघाचा भाग होतो, हे माझं भाग्यच होय. ज्यासाठी माझी निवड झाली, ते काम मी व्यवस्थित पार पाडले होते.
धोनी सर्वात मोठी ताकद -
विराट कोहलीने आरसीबी पॉडकास्टवर बोलताना सांगितलं की, अनुष्का शर्माशिवाय धोनीने मला माझ्या कठीण काळात सपोर्ट केला. धोनी माझी मोठी ताकद आहे. धोनीकडून मला खूप मोठा पाठिंबा मिळाला. कुटुंब, लहानपणीचा कोच यांच्याशिवाय फक्त धोनीने कठीण काळात मला मदत केली. खराब फॉर्म असताना धोनीने मानसिक आधार दिला, असे विराट कोहली म्हणाला.
एमएस धोनीशी संपर्क करणं खूप कठीण आहे. कारण, जर धोनीला फोन केला तर 99 टक्के तो उचलणार नाही, याची शाश्वती आहे. कारण, धोनी जास्त फोन पाहत नाही. मी धोनीसोबत दोन वेळा फोनवर बोललो आहे, असे विराट कोहली म्हणाला. करिअरमध्ये एक असा टप्पा असतो, त्यावेळी तुम्ही अशा व्यक्तीच्या संपर्कात राहू इच्छिता ज्याने तो अनुभवला आहे. एमएस धोनी अशा परिस्थितीतू गेला आहे, असे विराट कोहली म्हणाला.
आणखी वाचा :कांगारुंना घरचा आहेर, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने पॅट कमिन्सला सुनावलं, म्हणाला....