30 व्या विजयासह विराटच्या नेतृत्वाला निरोप, पाहा कर्णधारपदी कोहली असताना भारताचा सक्सेस रेट
T20 World Cup : टी-20 कर्णधार म्हणून विराट कोहलीनं सोमवारी अखेरचा सामना खेळला.
T20 Cricket : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये विराट कोहलीनं कर्णधार म्हणून आपला टी-20 चा अखेरचा सामना खेळला. भारतीय संघानं या सामन्यात नामिबियाचा 9 विकेट्सने पराभव केला. यासह विराट कोहलीच्या टी20 मधील नेतृत्वाचा शेवट विजयानं झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा टी20 मधील 30 वा विजय झाला. युएईमध्ये सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. विजयचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचं आव्हान साखळी स्पर्धेतच संपुष्टात आलं. नामेबियाचा पराभव करत टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्व आणि टी-20 विश्वचषकाला विजयी निरोप दिला.
विराट कोहलीचा सक्सेस रेट –
एम.एस. धोनीनंतर विराट कोहली भारताचा दुसरा सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार आहे. धोनीनं 2016 मध्ये टी-20 संघाचं नेतृत्वं सोडलं होतं. त्यानंतर टी-20 संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे आलं. आतापर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं 50 आंतरराष्टीय टी20 सामने खेळले आहेत. यापैकी भारतीय संघानं 30 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताला 16 सामन्यात पराभवाचा धक्का बसलाय. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा सक्सेस रेट 64 टक्के इतका राहिला.
कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा –
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार म्हणून भारताकडून विराटच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. तर जागतिक क्रिकेटमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. 50 सामन्यातील 47 डावांत विराट कोहलीनं 47.57 च्या सरासरीनं 1570 धावा चोपल्या आहेत. कर्णधारपदी असताना सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचच्या नावावर आहेत.
आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी –
कर्णधार म्हणून विराट कोहलीची कामगिरी चांगली आहे. मात्र विराटला एकही आयसीसी चषक उंचावता आलेला नाही. 2017 चॅम्पियन ट्रॉफी, 2019 एकदिवसीय विश्वचषक, 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रॉफी आणि टी20 विश्वचषकांमध्ये विराटला संधी होती. मात्र, विराट आयसीसी चषक जिंकण्यात अपयशी ठरलाय.
कसोटी-एकदिवसीयमध्ये विराटची कामगिरी –
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं 65 पैकी 38 कसोटी सामन्यात विजय संपादन केलाय. कसोटीमधील विराटचा सक्सेस रेट 58 टक्के इतका आहे. कसोटीमध्ये कर्णधार असताना विराट कोहलीनं 56 च्या सरासरीनं 5667 धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीनं 95 एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यापैकी 65 सामन्यात भारताचा विजय झालाय. एकदिवसीय सामन्यात कर्णधार असताना विराट कोहलीनं 72 च्या सरासरीनं 5449 धावा चोपल्या आहेत.