Shoaib Akhtar on Virat Kohli Retirement: जवळपास तीन वर्ष खराब फॉर्मशी झुंजणारा भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये परतलाय. नुकतीच पार पडलेल्या आशिया चषकात (Asia Cup 2022) विराट कोहलीनं त्याची सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत गणना का केली जाते? हे दाखवून दिलं. आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहलीनं 61 चेंडूत नाबाद 122 धावांची खेळी करत आपल्या कारकिर्दीतील 71 वं शतक ठोकलं, ज्यासाठी त्याला दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागली. तसेच यंदाच्या आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मोहम्मद रिझवाननंतर तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. दरम्यान, कोहली फॉर्ममध्ये परतल्यानंतरही त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरूच आहे. पाकिस्तानाचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनंतर शोएब अख्तरनंही विराटच्या निवृत्तीवर भाष्य केलंय. आगामी टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृती घेईल, असं शोएब अख्तरनं भाकीत केलंय.
शोएब अख्तर काय म्हणाला?
"भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आगामी टी-20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला अलविदा करेल. क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी विराट हा निर्णय घेऊ शकतो. विराटच्या जागी मी असतो तर, भविष्याचा विचार करून हाच निर्णय घेतला असता."
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट दुसरा फलंदाज
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. विराटनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 104 सामन्यात 138 च्या सरासरीनं 5 हजार 584 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे.
आशिया चषकात दमदार फलंदाजी
विराट कोहली जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये होता. परंतु, आशिया चषकात दमदार फलंदाजी करत त्यानं पुन्हा फॉर्म गवसलाय. आशिया चषकातील सुरूवातीच्या सामन्यात त्यानं लहान खेळी खेळल्या. परंतु, अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात 53 चेंडूत शतक झळकावलं. दरम्यान, 1 हजार 20 दिवसानंतर विराटच्या बॅटमधून शतक झळकलं.
विराटची कसोटी आणि एकदिवसीय कारकिर्द
विराटनं 102 कसोटी आणि 261 एकदिवसीय आंतराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. कसोटी सामन्यात विराटच्या नावावर 8 हजार 74 धावांची नोंद आहे. ज्यात 27 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 43 शतक आणि 64 अर्धशतकांच्या मदतीनं त्यानं 12 हजार 344 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-