World Cup 2023 India vs New Zealand : धर्मशालाच्या मैदानात आज टेबल टॉपवरमध्ये लढत होणार आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील लढतीकडे सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागलेय. धर्मशालाच्या मैदानावर कोणता संघ बाजी मारणार... हे काही तासांत स्पष्ट होईल. धरमशालाच्या मैदानावर फक्त विराट कोहलीला या मैदानावर शतकी खेळी करता आली आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील इतर एकाही खेळाडूला येथे शतक मारता आले नाही.  विराट कोहलीने धरमशालाच्या मैदानावर 127 धावांची खेळी केली आहे. त्याशिवाय त्याच्या नावावर एक अर्धशतकी आहे. 


धरमशालाच्या मैदानावर विराट कोहलीच किंग - 


धरमशालाच्या मैदानावर विराट कोहलीने तीन सामने खेळले आहेत. यामध्ये 212 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. धरमशालाच्या मैदानावर विराट कोहलीने न्यूझीलंडविरोधात अर्धशतक ठोकले आहे. विराट कोहलीने या मैदानावर 22 चौकार आणि चार षटकार ठोकले आहेत. विराट कोहलीनंतर या मैदानावर सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज सुरेश रैना आहे. धरमशालाच्या मैदानावर आतापर्यंत फक्त चार शतकांची नोंद आहे. यामध्ये विराट कोहली, डेविड मलान,  इयान बेल आणि सॅम्युअल्स यांनी धरमशालाच्या मैदानावर शतके ठोकली आहेत. भारताकडून या मैदानावर शतक मारण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. 






न्यूझीलंडविरोधात कोहलीचा शानदार रेकॉर्ड -


विश्वचषकात विराट कोहली लयीत आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून आतापर्यंत दोन अर्धशतके आणि एक शतक निघाले आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरोधात अर्धशतके ठोकली आहेत. तर बांगलादेशविरोधात शतक मारले आहे. विराट कोहलीची लय पाहता न्यूझीलंडची गोलंदाजीही तो फोडून काढेल. आतापर्यंत न्यूझीलंडविरोधात कोहलीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने न्यूझीलंडविरोधात 29 सामन्यात 1433 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान पाच शतके आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. आजही कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. 


सहा वर्षांपूर्वी न्यूझीलंडला दिली होती मात - 


2016 मध्ये धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने धरमशालाच्या मैदानात न्यूझीलंडचा सहा विकेटने पराभव केला होता. या सामन्यात विराट कोहलीने मॅच विनिंग खेळी केली.  
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या होत्या.  न्यूझीलंडकडून टॉम लेथम याने नाबाद 79 धावांची खेळी केली होती. भारताकडून हार्दिक पांड्या आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या होत्या. तर उमेश यादव आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.  भारतीय संघाने हे आव्हान 33.1 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात पार केले होते. टीम इंडियाकडून रोहित शर्मा 14, अजिंक्य रहाणे 33 धावा काडून बाद झाले होते. त्यानंतर विराट कोहलीने 81 चेंडूत नाबाद 85 धावांची खेळी केली होती. यामध्ये नऊ चौकार आणि एका षटकारांचा समावेश होता. धोनीने 21 धावांचे योगदान दिले होते.