Ajit Agarkar on Rinku Singh : टी ट्वेंटी वर्ल्डकपसंदर्भात कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विश्वचषकासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मंगळवारी टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यांची घोषणा कऱण्यात आली होती. त्यामध्ये रिंकू सिंह याचा समावेश नव्हता. त्यामुळे बीसीसीआयवर टीकेची झोड उडाली होती. याबाबत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्टीकरण दिली. रिंकूची कोणताही चूक नव्हती, पण संघाचं संतुलन महत्वाचं आहे, असं अजित आगरकर यांनी सांगितलं. 


मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना अजित आगरकर यांनी रिंकू सिंह याची 15 जणांमध्ये का निवड झाली नाही, याबाबत स्पष्टीकरण दिलं. रिंकू सिंह यानं काहीही चुकीचं केलं नाही. त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय अतिशय कठीण होता. पण संतुलित संघ निवडायचा होता. आपल्याला अतिरिक्त गोलंदाजाची गरज होती. त्यामुळे रिंकू सिंह याची 15 जणांमध्ये निवड झाली नाही. रिंकू सिंह याची निवड न होणं हे दुर्देवी आहे. रिंकू प्रमाणेच शुभमन गिल याची निवडही करता आली नाही. 






टी20 विश्वचषकाच्या संघाची निवड झाल्यानंतर रिंकू सिंह याच्यावरुन सोशल मीडियात वातावरण तापलं. माजी खेळाडूंनीही रिंकूची निवड न झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. इरफान पठाण, नवज्योत सिंह सिद्धू यांनी समालोचन करताना आपली नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय सोशल मीडियावरही रिंकूच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. रिंकू सिंह यानं मागील अनेक दिवसांपासून टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली.पण तरीही त्याला अंतिम 15 जणांमध्ये स्थान मिळालं नाही. रिंकू सिंह याला राखीव खेळाडूमध्ये स्थान देण्यात आले आहे. रिंकू सिंह याची निवड न झाल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. 


रिंकू सिंह याच्या वडिलांचीही नाराजी -


संघात स्थान न मिळाल्यानंतर रिंकू सिंह याच्या वडिलांनी देखील मनातील खंत बोलून दाखवली आहे. त्याशिवाय रिंकूची निवड झाली म्हणून आम्ही जल्लोष केला. पण रिंकूला 15 जणांमध्ये संधी मिळाली नाही, त्याची खंत असल्याचं ते म्हणाले. टीम इंडियासाठी आम्ही खूश आहोत, असेही त्यांनी सांगितलं. रिंकू सिंह यांचे वडील म्हणाले की,  रिंकू सिंह याची निवड झाल्याचं समजताच आम्ही फटके फोडून जल्लोष केला. रिंकू सिंह विश्वचषकात प्लेईंग 11 मध्ये खेळणार असल्याचं आम्हाला वाटलं, त्यामुळे आमचा आनंद गगणात मावत नव्हता. पण रिंकूनं आईला फोन करुन 15 जणांमध्ये निवड झाली नसल्याचं सांगितलं. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. 15 जणांमध्ये निवड न झाल्यामुळे रिंकूही थोडाफार नाराज झालेला, अशी माहिती रिंकूच्या वडिलांनी दिली. 


20 विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 


राखीव खेळाडू-
शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद