मुंबई : भारतीय क्रिकेट संघानं (Team India) ट्वेन्टी-20  विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 7 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावलं. टीम इंडिया विजेतेपद मिळवल्यानंतर चक्रीवादळामुळं अडकून पडली होती. गुरुवारी टीम इंडिया विशेष चार्टर्ड विमानानं नवी दिल्लीत झाली. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर संपूर्ण संघ मुंबईत दाखल झाला. मुंबईत नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजय परेड आयोजित करण्यात आली होती. या विजय परेड साठी मुंबईकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन कॅप्टन रोहित शर्मानं केलं होतं. त्यानुसार मोठ्या संख्येनं मुंबईकर मरीन ड्राईव्ह, वानखेडे स्टेडियमवर दाखल झाले होते. यावेळी कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या मुंबई पोलिसांना (Mumbai Police) विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी सलाम केला आहे. 


विराट कोहली आणि रवींद्र जडेजाकडून मुंबई पोलिसांना सलाम 


विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दोघांनी ट्वीट करत मुंबई पोलिसांना सलाम केला आहे. मुंबई पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद आणि आभार, असं विराट कोहलीनं म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये अभूतपूर्व कामगिरी केल्याचं विराट कोहलीनं म्हटलं आहे. तुमचं समर्पण आणि सेवेबद्दल सलाम, जय हिंद असं विराट कोहलीनं म्हटलं. 






रवींद्र जडेजानं देखील मुंबई पोलिसांचे खूप आभार मानतो असं म्हटलं. तुम्हीच खरे हिरो आहात, तुमची कामगिरी विलक्षण होती, असं जडेजानं म्हटलं.  






मुंबई पोलिसांनी देखील रवींद्र जडेजा आणि विराट कोहलीच्या ट्वीटला रिप्लाय दिला आहे. भारतीय संघानं मिळवलेल्या यशाबद्दल अशाच प्रकारचं जंगी स्वागत मुंबईकरांकडून होणं अपेक्षित होतं, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं.  


मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त


टीम इंडियाच्या स्वागतसाठी लाखो मुंबईकर नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान मरीन ड्राईव्हवर जमला होते. एवढ्या प्रचंड संख्येनं जमलेल्या मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांवर होती. मुंबई पोलिसांनी लाखो चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत टीम इंडियाला वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचवलं.  काही जणांना गर्दीमुळं प्रकृतीचा त्रास व्हायला सुरु होताच पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मुंबई पोलिसांनी टीम इंडियाच्या विजयी परेडसाठी विशेष नियोजन केलं होतं. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर पोहोचत असताना मुंबई पोलिसांनी सायरन बजता गया और रास्ता बनता गया, असं ट्विट केलं होतं. लाखो मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या कामाला विराट कोहली आणि रवींद्र जडेजानं सलाम केलाय. 


संबंधित बातम्या :



Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...