T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये 2 जूनपासून टी20 वर्ल्डकप 2024 च्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभात यंदा 20 संघ खेळणार आहेत, म्हणजेच जवळपास 300 खेळाडू विश्वचषकासाठी पोहचले आहेत. पण क्रिकेटच्या या सर्वात छोट्या फॉर्मटवर विराट कोहली आणि बाबर आझमचेच वर्चस्व आहे. टी20 क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स झालेत, या विश्वचषकात होतीलही पण.. विराट आणि बाबर यांच्या आसपासही कुणी नाही. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या विक्रमात विराट आणि बाबर सर्वात पुढे आहेत. त्यामुळे इतर 298 खेळाडूंपेक्षा विराट-बाबर खास ठरतात. 


विराट कोहली आणि बाबर आझमचा खास रेकॉर्ड -


विराट कोहली आणि बाबर आझम यांना टी20 क्रिकेटचा किंग म्हटले जाते. कारण, टी20 क्रिकेटच्या इतिहासात चार हजार धावांचा पल्ला पार करण्याचा पराक्रम फक्त या दोघांनाच करता आलाय. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम इंग्लंडविरोधातील चौथ्या टी20 सामन्यात 36 धावांची खेळी केली, त्यासह तो चार हजार धावांचा पल्ला पार करणारा दुसरा खेळाडू ठरला. बाबर आझमने 119 व्या सामन्यातील 112 व्या डावात चार हजार धावांचा पल्ला पार केलाय. विराट कोहलीने 107 डावात 4 हजार धावांचा पल्ला पार केला होता. 


फक्त 14 धावांचेच अंतर, विश्वचषकानंतर कोण पोहचणार नंबर 1


टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली आणि बाबर आझम अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोघांमध्ये फक्त 14 धावांचेच अंतर आहे. बाबर आझमने 119 सामन्यात 4023 धावा केल्या आहेत. विराट कोहली बाबरपेक्षा फक्त 14 धावांनी पुढे आहे. विराट कोहलीने 117 सामन्यात 4037 धावा केल्या आहेत. अर्धशतकात विराट पुढे आहे, तर शतकामध्ये बाबरची तोड नाही. टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीला फक्त एक शतक ठोकता आलेय. तर बाबर आझम याने टी20 क्रिकेटमध्ये तीन शतके ठोकली आहेत. 


आगामी टी20 विश्वचषकात बाबर आझम विराट कोहलीचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विराट कोहली सध्या शानदार लयीत आहे, यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीही खोऱ्याने धावा काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अव्वल कोण राहणार...हे विश्वचषकानंतरच स्पष्ट होईल. 


या रेकॉर्ड्समध्ये बाबर अव्वल क्रमांकावर 


टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्या फलंदाजात बाबर आझम अव्वल स्थानावर आहे, विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.  बाबर आझमने टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 432 चौकार ठोकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आय़र्लंडचा पॉल स्टर्लिंग याचा क्रमांक लागतो. पॉल स्टर्लिंग याने आतापर्यंत 417 चौकार ठोकले आहेत. विराट कोहलीने आपल्या करिअरमध्ये  361 चौकारांचा पाऊस पाडलाय.