T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषकासाठी टीम इंडिया अमेरिकेत दाखल झाली आहे. रोहित शर्मासह सर्व खेळाडूंनी नेट्समध्ये कसून सराव केलाय. पाच जून पासून भारतीय संघ विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करणार आहे. पण त्याआधी प्लेईंग 11 च्या चर्चेने जोर धरला आहे. भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैना यानं भारतीय संघाच्या प्लेईंग 11 संदर्भात मोठं वक्तव्य केलेय. टी20 विश्वचषकात जिंकायंच असेल तर विस्फोटक फलंदाजांना स्थान देणं गरजेचं आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यावर विजय मिळवायचा असेल तर यशस्वी जायस्वाल आणि शिवम दुबे या दोघांनाही प्लेईंग 11 मध्ये संधी द्यायला हवी, असे सुरेश रैना म्हणालाय. येथील संथ खेळपट्टीवर विराट कोहलीची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावरच खेळवायला हवं, असेही रैना म्हणाला. 


सर्वात मोठं आव्हान काय असेल - 


सुरैश रैनाने टीम इंडियासाठी 78 टी 20 सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने 1605 धावा काढल्या आहेत. सुरेश रैना म्हणाला की, टी20 विश्वचषकात जो बिनदास्त अन् आक्रमक खेळेल तोच जिंकेल. टी20 मध्येही काहीही होऊ शकतं. अमेरिकेत क्रिकेट खेळण्याचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे, तेथील वेळेशी जुळवून घेणं होय. आपल्याला सकाळी दहा वाजता सामना खेळायचा आहे, इतक्या सकाळी व्हाईट बॉलनं खेळण्याची सवय नाही. हे थोडं आव्हानात्मक असेल. तेथील खेळपट्ट्याही संथ असतील.


रोहितला कठीण निर्णय घ्यावे लागतील - 


यशस्वी जायस्वाल आणि शिवम दुबे या दोघांनाही प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यासाठी रोहित शर्माला कठीण निर्णय घ्यावा लागेल. यशस्वी जायस्वाल संघात असावं असं मला वाटतेय. विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. अमेरिकेतील खेळपट्ट्या संथ आहे, तिथे एकेरी-दुहेरी धावसंख्येला जास्त महत्व असेल. फलंदाजी करताना धावा चोरणाऱ्याची गरज असेल, त्यामुळे विराट कोहलीला रनमशीन अन् चेज मास्टर म्हटले जातं. अखेरच्या षटकात फलंदाजी करण्यासाठी ऋषभ पंत आणि शिवम दुबे यासारखे विस्फोटक फलंदाज आहेत. ज्यांच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. 


दुबे-यशस्वी प्रतिभावंत -


यशस्वी जायस्वाल युवा अन् प्रतिभावंत खेळाडू आहे. तो निर्भयपणे फलंदाजी करतो. शिवम दुबेही असाच फलंदाजीसाठी ओळखला जतो. शिवम दुबे कोणत्याही चेंडूवर षटकार मारु शकतो. त्याच्याकडे क्षमता प्रचंड आहे. युवराज सिंह आणि एमेस धोनीसारखी पॉवर हिटिंग क्षमता दुबेकडे आहे. शिवम दुबे हुकुम का एक्का आहे, पण यशस्वी जायस्वालच्या उपस्थित त्याला स्थान मिळणं कठीण दिसतेय. दोघांनाही प्लेईंग 11 मध्ये स्थान द्यायंच असेल तर रोहित शर्माला कठीण निर्णाय घ्यावा लागेल.