Vinod Kambli: भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती अस्वस्थतेमुळे भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विनोद कांबळींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
विनोद कांबळींनी काल रुग्णालयातून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मी क्रिकेट कधीही सोडलं नाही, आणि कधी सोडणारही नाही. इतकी शतकं, द्विशतकं केली आहेत, सगळं लक्षात आहे माझ्या, असं विनोद कांबळींनी सांगितले. आयुष्य भरभरुन जगा, दारु पिऊ नका, कारण आई-बाबांना ते आवडणार नाही, असं आवाहन विनोद कांबळींनी तरुणांना केलं आहे. सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी तुला प्रकृती स्वास्थ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, असं सांगितलं असता, विनोद म्हणाला, सचिन बोलला, माझी तब्येत ठीक नव्हती, पण त्याचा नेहमी आशीर्वाद असतो, असं विनोद कांबळींनी सांगितले.
विनोद कांबळींवर मोफत उपचार-
आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर हे बालपणापासून क्रिकेटचे चाहते असून त्यांनी विनोद कांबळी यांचे अनेक सामने पाहिले आहेत. सोशल मीडियावर विनोद कांबळींच्या प्रकृती अस्वस्थतेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी भावनिक होत त्यांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तत्काळ कांबळी यांना रुग्णालयात दाखल करून घेतले.
विनोद कांबळी कोणात्या आजाराशी झुंज देतोय?
रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी दिसल्या. आता मंगळवारी त्याच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येणार आहेत. डॉ. त्रिवेदी यांनी असेही उघड केले की रुग्णालयाचे प्रभारी डॉ. एस सिंग यांनी कांबळीला आयुष्यभर मोफत उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे. विनोद कांबळी यांची प्रकृती आता ठीक असल्याचं समोर आलं. तसेच विनोद कांबळींच्या मूत्राशयाला संसर्ग झाला असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉ. शैलेश सिंह ठाकूर यांनी दिली.
विनोद कांबळींची कारकीर्द-
विनोद कांबळी यांची क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 1991 मध्ये झाली. 1991 साली त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर 1993 साली त्यांनी कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केली. 2000 च्या दशकात विनोद कांबळी यांचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला. म्हणून त्यांना 2000 सालानंतर टीम इंडियात स्थान मिळाले नाही. विनोद कांबळी 2000 साली शारजाहमध्ये शेवटची मालिका खेळले होते. त्यानंतर टीममध्ये कमबॅकसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.