Maharashtra vs Uttar Pradesh, Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) वादळी खेळीसमोर उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यातील 49 व्या षटकात ऋतुराजनं उत्तर प्रदेशचा गोलंदाज शिवा सिंहच्या (Shiva Singh) गोलंदाजीवर सात षटकार ठोकून इतिहास रचला. यासह उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंहच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झालीय. आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजीच्या गोलंदाजीवर सात षटकार मारले गेले नाहीत. तसेच एका षटकात सात षटकार मारणारा ऋतुराज गायकवाड जगातील पहिला फलंदाज ठरलाय. 


कोण आहे शिवा सिंह?
शिवा सिंह उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. शिवा भारताच्या अंडर-19 संघाचाही भाग आहे. त्यानं पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली 2018 मध्ये अंडर 19 विश्वचषकही जिंकला आहे. 2018 च्या अंडर-19 विश्वचषकात शिवानं 6 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याचबरोबर या विश्वचषकात तो खूपच किफायतशीर ठरला. विश्वचषकादरम्यान त्यांची इकोनॉमी केवळ 3.23 इतकी होती. 23 वर्षीय शिवा सिंहनं 2018-19 मध्ये उत्तर प्रदेशसाठी लिस्ट ए क्रिकेटचा पहिला सामना खेळला होता.


शिवा सिंहच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत गायकवाडनं शिवा सिंहला एका षटकात सात षटकार ठोकले. या षटकात त्यानं नो बॉलसह एकूण सात चेंडू टाकले. या सातही चेंडूवर ऋतुराजनं सलग सात षटकार मारून इतिहासाला गवसणी घातली. एका षटकात सात षटकार तसेच एका षटकात 43 धावा ठोकणारा ऋतुराज गायकवाड जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर शिवा सिंह एका षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे.


महाराष्ट्राचं उत्तर प्रदेशसमोर 331 धावांचं आव्हान
या सामन्यात उत्तर प्रदेशच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली.परंतु, कर्णधार ऋतुराजच्या वादळी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राच्या संघानं उत्तर प्रदेशसमोर 331 धावांचं लक्ष्य ठेवलं. महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाडनं 159 चेंडूत नाबाद 220 धावांनी तुफानी खेळी केली. उत्तर प्रदेशकडून कार्तिक त्यागीनं 3 विकेट्स घेतल्या. तर, राजपूत आणि शिवम शर्मा यांच्या खात्यात एक-एक विकेट्स जमा झाली. 


हे देखील वाचा-