Maharashtra vs Uttar Pradesh: विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) विश्वविक्रमाला गवसणी घातलीय. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्यानं एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरलाय. ऋतुराज गायकवाड सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंहनं (Yuvraj Singh) 15 वर्षांपूर्वी एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं केलीय.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात आज क्वार्टर फायनल सामना खेळला जातोय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्रानं उत्तर प्रदेशसमोर 50 षटकात 331 धावांचं लक्ष्य ठेवलं. महाराष्ट्राकडून ऋतुराजनं अवघ्या 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी. ज्यात 10 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाडचं हे मागील आठ डावातील सहावं शतक आहे. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्त्वाचा भाग आहे. 25 वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकिर्दीतील हे 13वं शतक आहे.
व्हिडिओ-
शिवा सिंहच्या गोलंदाजीवर ऋतुराजची विक्रमी खेळी
महाराष्ट्राच्या डावातील 49 षटकात डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंह गोलंदाजी करण्यासाठी आला. ऋतुराजनं या षटकातील चार चेंडूत सलग चार षटकार ठोकले. त्यानंतर पाचवा चेंडू नो बॉल ठरला. यावरही ऋतुराजनं उत्तुंग षटकार मारला. त्यानंतर अखेरच्या दोन्ही चेंडूवर दोन षटकार मारून ऋतुराजनं एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला.
ऋतुराजची द्विशतकीय खेळी
ऋतुराज गायकवाडनं 109 चेंडूत शतक पूर्ण केलं आणि 138 चेंडूत 150 धावांचा टप्पा गाठला. म्हणजेच त्याच्या पुढच्या 50 धावा फक्त 29 चेंडूत आल्या. 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली. त्यानं अजी काझीसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. अझीम 42 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. उत्तर प्रदेशचा कार्तिक त्यागी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 66 धावांत 3 विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-