Vijay Hazare Trophy 2022 Final: महाराष्ट्र आणि सौराष्ट्र (Maharashtra vs Saurashtra) यांच्यात विजय हजारे 2022चा फायनल सामना खेळला जातोय. या सामन्यात महाराष्ट्राचे कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणखी एक शतक ठोकून संघाला सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचवलं. विजय हजारे ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात ऋतुराज गायकवाडनं मागच्या पाच डावात चार शतकं झळकावली आहेत. आजच्या सामन्यात त्यानं संथ खेळी केली. पण त्यानंतर त्यानं आपला गियर बदलत आणि सौराष्ट्राच्या गोलंदाजांची शाळा घेतली. ऋतुराजनं शतकी कामगिरीसह नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनलमध्ये सलग तीन शतक झळकावणारा ऋतुराज पहिला फलंदाज ठरलाय.


यंदाच्या हंगमात ऋतुराज गायकवाडनं मागच्या पाच डावात नाबाद 124, 40, नाबाद 220, नाबाद 168 आणि 108 धावांची खेळी केली. सौराष्ट्रविरुद्ध सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर महाराष्ट्राचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. दरम्यान, महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पवन शाह अवघ्या चार धावांवर रन आऊट झाला. सत्यजीत आणि ऋतुराजनं संघाची धावसंख्या 74 धावापर्यंत पोहचवली. पण महाराष्ट्राची धावगती संथ होती. त्यानंतर ऋतुराजनं संयमी खेळी करत संघाची धावसंख्या 200 पार पोहचवण्यात मदत केली.


ऋतुराजची नव्या विक्रमाला गवसणी
ऋतुराज गायकवाडनं क्वार्टर फायनलमध्ये दुहेरी शतक (नाबाद 220 धावा) झळकावलं होतं. सेमीफायनलमध्ये नाबाद 168 धावांची खेळी केली. त्यानंतर आज 108 धावांची खेळी केली. विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनलमध्ये सलग तीन शतकं झळकावली आहेत. 


नॉनस्टॉप ऋतुराज गायकवाड
2021 च्या विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराज गायकवाड सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. त्यानं मागील 10 डावात आठ शतकं ठोकली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या फंलदाजांच्या यादीत तो टॉपवर पोहचलाय. त्यानं अंकित बावने आणि रॉबिन उथप्पा यांना मागं टाकलं आहे. अंकित आणि उथप्पा यांच्या नावावर प्रत्येकी 11-11 शतकं झळकावली आहेत.  


महाराष्ट्राचं सौराष्ट्रासमोर 249 धावांचं आव्हान
कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राच्या संघानं सौराष्ट्रासमोर (Maharashtra vs Saurashtra) 249 धावांचं लक्ष्य ठेवलंय. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला महाराष्ट्राचा संघ संघर्ष करताना दिसला. मात्र, ऋतुराज गायकवाडनं एकाकी झुंज देत 131 चेंडूत 108 धावांची खेळी केली. ऋतुराज व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. दरम्यान, सौराष्ट्राच्या संघानं गोलंदाजी हीच त्यांची खरी ताकद असल्याचं दाखवून दिलं. त्यांनी या सामन्यात अत्यंत किफायती गोलंदाजी केली.


हे देखील वाचा-