Varun Chakravarthy IND vs ENG 3rd T20 : भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाज येताच त्यांनी इंग्लिश फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने असा सापळा रचला की इंग्रज त्यात सहज अडकले. राजकोट टी-20 मध्ये वरुण चक्रवर्तीने एकट्याने इंग्लंडच्या अर्धा संघाची शिकार केली. वरुणने 4 षटकांत फक्त 24 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. या खेळाडूने टी-20 मालिकेत एकूण 10 विकेट्स घेतल्या आहेत आणि यासोबत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात, कर्णधार जोस बटलरच्या विकेटनंतर त्याने इंग्लंडच्या जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटर्न, ब्रेंडन कार्स आणि जोफ्रा यांच्या विकेट घेऊन पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. अशाप्रकारे वरुण चक्रवर्तीने त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये पाच विकेट्स घेतल्या. यासह, वरुण चक्रवर्ती टी-20 क्रिकेटमध्ये दोनदा सर्वात जलद पाच विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. वरुणने त्याच्या कारकिर्दीतील फक्त 16 व्या सामन्यात ही कामगिरी केली.
वरुण चक्रवर्तीने 10 विकेट्स घेत रचला इतिहास
वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाता टी-20 मध्ये त्याने 23 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. त्याने चेन्नईमध्ये 2 विकेट्स घेतल्या आणि आता राजकोटमध्ये या खेळाडूने 5 विकेट्स घेत 10 विकेट्स पूर्ण केल्या. दोन टी-20 मालिकांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा वरुण चक्रवर्ती हा पहिला भारतीय खेळाडू आहे.
याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत वरुण चक्रवर्तीने 12 विकेट्स घेतल्या होत्या. आता त्याने इंग्लंडविरुद्धही 10 विकेट्स घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीच्या फिरकी जाळ्यात विरोधी फलंदाज अडकत आहेत. चक्रवर्तीबद्दल खास गोष्ट म्हणजे त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रमही केला होता.
वरुण चक्रवर्तीचे जबरदस्त पुनरागमन
वरुण चक्रवर्तीने टीम इंडियामध्ये शानदार पुनरागमन केले आहे. चक्रवर्ती पहिल्या ६ टी-20 सामन्यांमध्ये फक्त 2 विकेट घेऊ शकला, पण त्याच्या पुनरागमनानंतर या खेळाडूने 10 टी-20 सामन्यांमध्ये 27 विकेट घेतल्या आहेत. टीम इंडियामधून वगळल्यानंतर चक्रवर्तीने त्याच्या गोलंदाजीवर काम केले हे स्पष्ट आहे, हा खेळाडू टी-20 स्वरूपात भारतासाठी मोठा सामना जिंकणारा खेळाडू बनला आहे.
हे ही वाचा -