टेक्सास : वेस्ट इंडिड आणि अमेरिका यांच्यावतीनं टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. या स्पर्धेपूर्वी बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात तीन टी-20 मॅचची मालिका सुरु आहे. या मालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. अमेरिकेनं बांगलादेशला सलग दुसऱ्या मॅचमध्ये पराभूत करत ऐतिहासिक मालिका विजय मिळवला आहे. अमेरिकेनं बांगलादेशला 6 धावांनी पराभूत केलं. आता या मालिकेतील तिसरी मॅच 25 मे रोजीहोणार आहे. 


 
अमेरिका आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी मॅच टेक्सासमध्ये पार पडली. बांगलादेशनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेनं 6 विकेटवर 144 धावा केल्या. अमेरिकेचा कॅप्टन मोनांक पटेल यानं 38 बॉलमध्ये चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 42 धावा केल्या. तर, एरोन जोन्सनं 34 बॉलवर  3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 35 धावा केल्या, बांगलादेशच्या शोरफुल इस्लाम, मुस्तफिजूर रहमान आणि रिशाद हुसैन यांनी दोन दोन विकेट घेतल्या. 



अमेरिकेनं विजयासाठी दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 20 व्या ओव्हरमध्ये 3 बॉल शिल्लक असताना बाद झाला. बांगलादेशला 19.3 ओव्हरमध्ये 138 धावा करता आल्या. बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसैन शांतोनं 34 बॉलवर 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 36 धावा केल्या. तर, शाकिब अल हसननं 23 बॉलवर 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 30 धावा केल्या. अमेरिकेच्या अली खाननं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. 


बांगलादेश कमबॅक करणार?


अमेरिका आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने तर पार पडले आहेत. बांगलादेशनं दोन सामन्यांसह मालिका देखील गमवाली आहे. आता बांगलादेशचा संघ तिसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवून पुन्हा ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. अमेरिकेचा संघ तिसऱ्या मॅचमध्ये देखील विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. अमेरिकेनं 25 मे रोजी होणाऱ्या मॅचमध्ये विजय मिळवल्यास ते बांगलादेशला व्हाईट वॉश देऊ शकतात.  अमेरिकेनं यापूर्वी 2021 मध्ये आयरलँडला पराभूत करत खळबळ उडवून दिली होती. आता अमेरिकेच्या नवख्या टीमनं बांगलादेशला दोन टी-20 मॅचमध्ये पराभवाचं पाणी  पाजलं आहे.


भारत आणि बांगलादेश सराव सामना


बांगलादेश टी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारतासोबत सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना देखील दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. 


संबंधित बातम्या : 


चेन्नईच्या पराभवानंतर ऑनकॅमेरा ढसाढसा रडला, आता आरसीबीच्या जखमेवर मीठ चोळलं,माजी खेळाडूच्या वक्तव्यानं खळबळ, म्हणाला...


पहिल्या प्रेमात धोका, संसार मोडला, करिअरमध्येही चढ-उतार, दीपिकानं पुन्हा आयुष्य सावरलं, कार्तिकची संघर्षमय कहाणी!