कोलंबो : श्रीलंकेच्या क्रिकेट टीममधील दिग्गज आणि स्पिनर मुथय्या मुरलीधरन आता एक नवीन जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. श्रीलंकेतील नवनिर्वाचित राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी स्वतः मुरलीधरनची श्रीलंकेच्या उत्तर प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींकडून निवडण्यात येणाऱ्या तीन नव्या राज्यपालांमध्ये मुरलीधरनचा समावेश असणार आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 विकेट घेणारा 47 वर्षीय मुरलीधरन आता श्रीलंकेचा राज्यपाल म्हणूनही ओळखला जाणार आहे.

डेली मिररने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी मुरलीधरनला उत्तर श्रीलंकेचा राज्यपाल म्हणून निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपती सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी स्पिनर मुरलीधरन उत्तर श्रीलंकेचा राज्यपाल असणार आहे तर अनुराधा यमपथ पूर्व श्रीलंकेच्या राज्यपाल असणार आहेत. तसेच तिस्सा विथारना उत्तर मध्ये प्रांताचे राज्यपाल म्हणून पदाभार सांभाळणार आहेत.

दरम्यान, अनुराधा यमपथ राष्ट्रवादी उद्यमी संघाच्या अध्यक्षा आणि एका प्रतिष्ठित वस्त्र निर्यात कंपनीच्या संचालिका आहेत. तर तिस्सा विथारणा माजी मंत्री आणि लंका समा समाज पार्टीचे नेता आहेत. तर मुरलीधरनने मार्च 2005मध्ये चेन्नई मध्ये राहणाऱ्या मधिमलार राममूर्ति यांच्याशी विवाह केला होता.

47 वर्षीय माजी क्रिकेटर मुरलीधरनने 133 कसोट्यांमध्ये सर्वात जास्त 800 विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्याने 2010मध्ये कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतली होती. मुथय्या मुरलीधरनने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 534 आणि 12 टी-20मध्ये 13 विकेट्स घेतले आहेत. ऑफ-ब्रेक स्पिनर म्हणून ओळखला जाणारा मुरलीधरन जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक समजला जातो.

संबंधित बातम्या :

धोनीमुळे 2011च्या विश्वचषकात माझं शतक हुकलं - गौतम गंभीर

कोहलीकडून गांगुलीचं कौतुक; सुनिल गावस्कर मात्र भडकले