अॅडलेड : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांमध्ये अॅडलेड येथे डे-नाईट कसोटी सामना सुरु आहे. या कसोटीत सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव तीन बाद 589 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाच्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबूशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 361 धावांची भागीदारी रचली.
वॉर्नरने आज पाकिस्तानी गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला होता. त्याला लॅबूशेनने चांगली साथ दिली. डेव्हिड वॉर्नरने लॅबूशेननंतर स्टिव्ह स्मिथसोबत 121 तर मॅथ्यू वेडसोबत 99 धावांची भागीदारी रचली. लॅबूशेनने 238 चेंडूंत 22 चौकारांसह 162 धावांची खेळी उभारली. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानची सहा बाद 96 अशी दाणादाण उडाली आहे.
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने कसोटी कारकीर्दीतले पहिले त्रिशतक झळकावून आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक साजरं करणारा तो ऑस्ट्रेलियाचा सातवा फलंदाज ठरला. वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत नाबाद 335 धावांची खेळी उभारली. त्याने 418 चेंडूंमधली ही खेळी 39 चौकार आणि एका षटकाराने सजवली.
वॉर्नरने ही कामगिरी बजावून ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावांचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाकडून 334 धावांचा उच्चांक आजवर डॉन ब्रॅडमन आणि मार्क टेलरच्या नावावर होता. तो विक्रम त्याने आज मोडीत काढला आहे.
तसेच अॅडलेडच्या मैदानावर सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विक्रमही डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर होता. हा रेकॉर्डदेखील वॉर्नरने मोडीत काढला आहे. 29 जानेवारी 1932 रोजी ब्रॅडमन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अॅडलेडच्या मैदानावर नाबाद 299 धावांची खेळी केली होती. वॉर्नरने आज त्रिशतक झळकावत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
ऑस्ट्रेलियाने 589 धावांचा डोंगर उभारल्यानंतर डाव घोषित केला. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे. दिवसअखेर पाकिस्ताची अवस्था 6 बाद 96 अशी झाली. पाकिस्तानकडून बाबर आझम एका बाजूने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धैर्याने सामना करत आहे. तो सध्या नाबाद 43 धावांवर खेळत आहे. त्याच्याव्यतिरिक्त पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आले आहे.
डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानला झोडपले, त्रिशतकी खेळीसह डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडीत
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
30 Nov 2019 06:30 PM (IST)
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांमध्ये अॅडलेड येथे डे-नाईट कसोटी सामना सुरु आहे. या कसोटीत सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव तीन बाद 589 धावांवर घोषित केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -