India tour of Ireland: भारताचा टी-20 संघ सध्या आयर्लंड (IRE Vs IND) दौऱ्यावर गेलाय.दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना काल डबलिनमधील (Dublin) ‘द व्हिलेज स्टेडियम’वर (The Village)  खेळण्यात आला. या सामन्यात भारतानं सात विकेट्स राखून विजय मिळवला.  या विजयामुळं दोन सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या उमरान मलिकनं (Umran Malik) पदार्पणाच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात उमरान मलिकनं फक्त एकच षटक टाकलं, ज्यात त्यानं 14 धावा दिल्या. 


आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्या भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व करत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्यानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पावसाच्या वारंवार व्यत्ययामुळं सामना दोन तास उशीरा सुरू करण्यात आला. दोन्ही डावांतील 8-8 षटके कमी करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडच्या संघानं 12 षटकात चार विकेट्स गमावून भारतासमोर 109 धावांचं लक्ष्य ठेवलंय. आयर्लंडकडून हॅरी टेक्टर तुफानी खेळी करत 33 चेंडूत 193 च्या सरासरीनं 64 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, आवेश खान आणि युजवेंद्र चहलला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं 9.2 षटकातच सामना जिंकला. भारताकडून दिपक हुडानं 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली. 


उमरान मलिकची दमदार कामगिरी
आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्याआधी सनरायझर्स हैदराबादनं उमरान मलिकला चार कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. आयपीएल 2022 मध्ये उमराननं उत्कृष्ट गोलंदाजी केलीय. या हंगामात त्याचा सरासरी वेग 145 ते 150 किमी प्रतितास इतका होता. त्यानं आयपीएलच्या मागच्या हंगामात 157 किमी प्रतितासाच्या वेगानं टाकला होता. उमरान मलिकनं 14 सामन्यांत एकूण 22 विकेट घेतल्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो टॉप-5 मध्ये सामील झाला.


हे देखील वाचा-