U19 Team India vs Australia U19 Final: कांगारूंनी पुन्हा एकदा टीम इंडियाला (Team India) रडवलं. ऑसी संघानं मोठ्या शिताफिनं टीम इंडियाच्या धुरंधरांना थोपवत तब्बल चौथ्यांदा वर्ल्डकपवर (U19 World Cup 2024) आपलं नाव कोरलं. अंडर-19 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात खेळवण्यात आला. विजेतेपदाच्या लढतीत कांगारूंनी टीम इंडियाचा तब्बल 79 धावांनी पराभव केला. अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय कर्णधार उदय सहारननं (Uday Saharan) आपली चूक उघडपणे मान्य केली आणि पराभवाचं कारणही सांगितलं.


अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून तब्बल 79 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्डकपमधील पराभवानंतर भारतीय युवा क्रिकेट संघाचा कर्णधार उदय सहारननं आपली चूक मान्य करत, आपण आपली रणनीती अंमलात आणली नाही आणि खराब शॉट्स खेळण्याचे परिणाम भोगले, असं सांगितलं. 


ऑसी संघाविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं सर्वात आधी खेळताना 50 ओव्हर्समध्ये तब्बल सात विकेट्स गमावत 253 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाचं आव्हान स्विकारत फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला मात्र कांगारूंनी मोठ्या शिताफीनं थोपवलं. टीम इंडिया 43.5 ओव्हर्समध्ये केवळ 174 धावा करुन ऑलआऊट झाली. टीम इंडियाकडून केवळ सलामीवीर आदर्श सिंह (47) आणि आठव्या क्रमांकाचा फलंदाज मुरुगन अभिषेक (42) यांनी सर्वाधिक धावा केल्या, या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाचे इतर सर्व फलंदाज मात्र फारशी खेळी करु शकले नाहीत. 


आम्ही रणनितीवर लक्ष दिलं नाही; टीम इंडियाच्या कर्णधाराकडून चूक मान्य 


वर्ल्डकप फायनलनंतर कर्णधार उदय सहारन म्हणाला की, "आम्ही काही खराब शॉर्ट खेळलेत आणि क्रीजवर उभं राहण्यात अपयशी ठरलो. आम्ही तयारी उत्तम केलेली परंतु, आम्ही आमच्या रणनितीवर लक्ष दिलं नाही. या टुर्नामेंटमधून खूप काही शिकायला मिळालं. आम्ही शिकत राहू आणि आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू."


वर्ल्डकप फायनल गमावल्यानंतर कर्णधार उदय सहारन फारच निराश झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानं आपली चूक मान्य केली, पण त्यासोबतच टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुकही केलं. "संपूर्ण वर्ल्डकप जर्नी खूपच चांगली होती, मला संघातील सर्वच खेळाडूंचा अभिमान आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच त्यांनी धमाकेदार कामगिरी केली." 


टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो


मुशीर खान, उदय सहारन, सचिन दास आणि प्रियांशू मौलिया यांसारख्या फलंदाजांनी निराशा केली. टीम इंडियाचे फलंदाज सतत पॅव्हेलियनमध्ये परतत होते. सलामीवीर आदर्श सिंहने एक बाजू लावून धरली, पण  दुसऱ्या बाजूने विकेट कोसळल्या. त्यामुळे भारतीय संघाचा 79 धावांनी पराभव झाला. भारताकडून आदर्श सिंहने 77 चेंडूत सर्वाधिक 47धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेहेल बियर्डमन आणि राफे मॅकमिलन हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. मेहेल बियर्डमन आणि राफे मॅकमिलन यांना 3-3 यश मिळाले. कॅलम वाइल्डरने 2 बळी घेतले. चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रेकरने 1-1 फलंदाज बाद केले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IND vs AUS U19 WC Final : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने पुन्हा मीठ चोळले; अंडर-19 वर्ल्डकप चौथ्यांदा खिशात घातला!