IND vs AUS U19 WC Final : गेल्यावर्षी कॅप्टन रोहितच्या टीमला वरिष्ठ ऑस्ट्रेलिया टीमने फायनलमध्ये दणका दिल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच ज्युनिअर ऑस्ट्रेलियन टीमने टीम इंडियाला मीठ चोळले आहे. 254 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या टीम इंडियाचा डाव174 धावांमध्ये गुंडाळला गेला. बिअर्डमॅन आणि मॅकमिलनने प्रत्येकी तीन विकेट घेत टीम इंडियाची फळी कापून काढली. सलामीवीर आदर्श सिंहने केलेल्या 47 धावा सर्वाधिक ठरल्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या मुरूगन अभिषेकने 42 धावांची खेळी करून काही काळ संघर्ष केला, पण अपेक्षित साथ मिळाली नाही. टीम इंडियाचे सहा फलंदाज शंभरीच्या आत बाद झाल्याने पराभव निश्चित झाला होता. त्यामुळे सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अपुरे राहिले. ऑस्ट्रेलियाने तब्बल 14 वर्षांनी चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. त्यामुळे अवघ्या 84 दिवसांमध्ये टीम इंडियाच्या दोन्ही संघाना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलियानेमोठ्या फरकाने पराभव केला
टीम इंडियासमोर 254 धावांचे लक्ष्य होते. पण भारतीय संघ 43.5 षटकांत 174 धावांवरच मर्यादित राहिला. अशाप्रकारे टीम इंडियाला 79 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या 253 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताला पहिला झटका 3 धावांच्या स्कोअरवर बसला. अर्शीन कुलकर्णी ३ धावा करून बाद झाला. यानंतर विकेट्स बाद होण्याचा क्रम सुरूच राहिला. भारताचे टॉप-6 फलंदाज 91 धावांमध्येच पॅव्हेलियनमध्ये गेले.
टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो
मुशीर खान, उदय सहारन, सचिन दास आणि प्रियांशू मौलिया यांसारख्या फलंदाजांनी निराशा केली. टीम इंडियाचे फलंदाज सतत पॅव्हेलियनमध्ये परतत होते. सलामीवीर आदर्श सिंहने एक बाजू लावून धरली, पण दुसऱ्या बाजूने विकेट कोसळल्या. त्यामुळे भारतीय संघाचा 79 धावांनी पराभव झाला. भारताकडून आदर्श सिंहने 77 चेंडूत सर्वाधिक 47धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेहेल बियर्डमन आणि राफे मॅकमिलन हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. मेहेल बियर्डमन आणि राफे मॅकमिलन यांना 3-3 यश मिळाले. कॅलम वाइल्डरने 2 बळी घेतले. चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रेकरने 1-1 फलंदाज बाद केले.
ऑस्ट्रेलियाने 253 धावा केल्या
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यूज वायबगेनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 विकेट गमावत 253 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगने सर्वाधिक धावा केल्या. हरजस सिंगने 64 चेंडूत 55 धावा केल्या. ह्यू वायबगेनने 66 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले. याशिवाय ऑलिव्हर पीकने शेवटच्या षटकांमध्ये 43 चेंडूत 46 धावा केल्या. भारताकडून राज लिंबानी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. राज लिंबानी 10 षटकांत 38 धावांत 3 फलंदाज बाद केले. नमन तिवारीला 2 यश मिळाले. याशिवाय सौमी पांडे आणि मुशीर खान यांनी 1-1 कांगारू फलंदाज बाद केले.
सलग 6 सामने जिंकले, पण फायनलला मुकले...
मात्र, टीम इंडियाने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. भारतीय संघाने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्ध केली. बांगलादेश व्यतिरिक्त भारताने आयर्लंड, अमेरिका, न्यूझीलंड, नेपाळ आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. अशाप्रकारे टीम इंडियाने सलग 6 सामने जिंकले, मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
इतर महत्वाच्या बातम्या