(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या, पाहा 5 खेळाडूंची यादी
Top 5 Indian Bowler : आतापर्यंत झालेल्या महाकुंभामध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाच गोलंदाजाविषयी जाणून घेऊयात...
Top 5 Indian Bowler's with most Wickets in World Cup History : चांगला फलंदाज एखादा सामना जिंकून देतो... पण एखादा चांगला गोलंदाज स्पर्धा जिंकून देऊ शकतो, याबाबत कुणाचेही दुमत नसेल. गोलंदाजाच्या कामगिरीवरच मोठ्या स्पर्धेत एखाद्या संघाची कामगिरी अवलंबून असते. भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. यंदाची ही 13 वी विश्वचषक स्पर्धा आहे. आतापर्यंत झालेल्या महाकुंभामध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाच गोलंदाजाविषयी जाणून घेऊयात...
5. कपिल देव (Kapil Dev) :
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने 1983 चा विश्वचषक उंचावला होता. बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत भारताने चषकावर नाव कोरले होते. या विजयात कपिल देव यांचा मोठा वाटा होता. कपिल देव यांनी विश्वचषकाच्या 26 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेय. कपिल देव यांनी 26 सामन्यात 28 विकेट घेतल्या आहेत. एकाच सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रमही कपिल देव यांच्या नावावर आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये कपिल देव पाचव्या क्रमांकावर आहेत.
4. अनिल कुंबले (Anil Kumble) :
भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याचाही या यादीत समावेश आहे. अनिल कुंबळे याने विश्वचषकात भारतासाठी 18 सामने खेळले आहेत. या 18 सामन्यात 4.08 च्या अकॉनॉमीने 31 विकेट घेतल्या आहेत.
3. मोहम्मद शमी (Mohammed Shami) :
विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये मोहम्मद शामी तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शामीने विश्वचषकाचे फक्त 11 सामने खेळले आहेत. या 11 सामन्यात शामीने 31 विकेट घेण्याचा भीमपराक्रम केला आहे. शामीने एक वेळा पाच आणि तीन वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यंदाच्या विश्वचषकातही मोहम्मद शामीकडून दमदार कामगिरीची आपेक्षा असेल. अनुभवी मोहम्मद शामी भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो.
2. जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) :
भारतीय संघाचा आघाडीचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. श्रीनाथने विश्वचषकाच्या 34 सामन्यात प्रतिनिधित्व केलेय. जवागल श्रीनाथने 34 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत. श्रीनाथने विश्वचषकात दोन वेळा चार विकेट घेतल्या आहेत. जवागल श्रीनाथने विश्वचषकात 21 षटके निर्धाव फेकली आहेत.
1. झहीर खान (Zaheer khan) :
विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये झहीर खान पहिल्या स्थानावर आहे. 2011 च्या विश्वचषक विजयात झहीर खान याचा सिंहाचा वाटा होता. आयसीसीच्या महाकुंभामध्ये झहीर खान याने 23 सामन्यात 4.47 इकॉनॉमिनीने 44 विकेट घेतल्यात. झहीर खान याने विश्वचषकात 12 षटके निर्धाव फेकली अन् एक वेळा चार विकेट घेतल्या.