नवी दिल्ली: ट्वेन्टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया गुरुवारी सकाळी विशेष विमानाने दाखल झाली. भारतीय संघाने 29 जूनला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथे रंगलेल्या ट्वेन्टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर भारतीय क्रीडाप्रेमींच्या आनंदाला भरते आले आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यापासून टीम इंडिया (Team India) भारतात कधी दाखल होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर भारतीय संघाचे गुरुवारी सकाळी सात वाजता दिल्ली विमानतळावर आगमन झाले.
दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक-एक करुन भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे डोळे जी गोष्ट पाहण्यासाठी आसुसले होते, तो वर्ल्डकप दाखवला. दिल्ली विमानतळावरुन टीम इंडियाच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडताना रोहित शर्मा याने चाहत्यांच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावून दाखवला. याशिवाय, चाहत्यांच्या गराड्यातून दिल्ली विमानतळावरुन बाहेर पडताना रोहित शर्मा याने पुन्हा एकदा वर्ल्डकप ट्रॉफी उंचावली. वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला.
टीम इंडियाचे खेळाडू आता दिल्लीतील आयटीसी मौर्य या हॉटेलमध्ये काहीवेळ विश्रांती घेतील. त्यानंतर भारतीय खेळाडू साधारण 11च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जातील. त्यानंतर दुपारी 2 ते 3च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
विराट कोहलीने दिल्ली विमानतळाबाहेर येताच काय केलं?
भारतीय संघ विशेष विमानाने दिल्ली विमातळावर दाखल झाल्यानंतर खेळाडू एक-एक करुन बाहेर पडत होते. त्यावेळी विराट कोहली याने बसमध्ये शिरण्यापूर्वी भारतीय चाहत्यांना अभिवादन केले. दिल्ली एअरपोर्टवरील क्रिकेटप्रेमी मोठ्याने 'कोहली-कोहली' ओरडत होते. विराट कोहलीने त्यांच्याकडे पाहून अभिवादन केले. यावेळी विराट कोहलीच्या गळ्यात विश्वचषक स्पर्धेचे मेडल दिसत होते.
आणखी वाचा
गळ्यात विजयी मेडल...विराट कोहलीने दिल्ली विमानतळाबाहेर येताच काय केलं?; पाहा Video