Indian Cricket Team In Mumbai :  तब्बल 13 वर्षानंतर टीम इंडियाने विश्वचषकावर नाव कोरले. बार्बाडोसवरुन टीम इंडिया रवाना झाली असून गुरुवारी पहाटे दिल्लीमध्ये आगमन होणार आहे. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात प्रथमच टी-20 वर्ल्ड कप जिंकला. विश्वचषकात टीम इंडिया अजेय राहिली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. बेरीस चक्रीवादळाच्या संकटामुळे भारतीय संघ बार्बाडोसला अडकला होता. विशेष विमानाने टीम इंडिया भारतात परतणार आहे. बीसीसीआयने खेळाडूंसाठी, त्यांच्या घरच्यांसाठी, बीसीसीआय अधिकाऱ्यांसाठी, आणि स्पोर्ट्स स्टाफसाठी चार्टड प्लेनची व्यवस्था केली. गुरुवारी पहाटे दिल्ली एअरपोर्टवर टीम इंडिया दाखल होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीम इंडिया ब्रेकफास्ट करणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत ओपन बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे. त्यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहे. सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय काही वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. 


2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगज्जेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईमध्ये ओपन बसमधून जंगी मिरवणूक निघाली होती. तब्बल आठ तास चाललेल्या विश्वविजयी मिरवणूक संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा एकदा भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरलेय. विश्वविजेत्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी  पुन्हा एकदा मुंबईकर सज्ज झाले आहेत.


सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज


विश्वविजेत्यांच्या शोभायात्रेसाठी मुंबई पोलीस सज्ज आहे. काही वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथे त्यांची शोभायात्रा आयोजीत करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीसही सज्ज झाले असून वानखेडे स्टेडियमसह शोभायात्रेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर एन.एस मार्गाची उत्तर व दक्षिण वाहिनी एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.






वाहतूक मार्गात बदल -


वीर नरीमन रोड चर्चगेटपासून किलाचंद चौकपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय दिनशॉ वाच्छा मार्ग डब्ल्यू आय.ए चौकपासून रतनलाल बुबनाचौकापर्यंत वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच हुतात्मा चौकापासून वेणूताई चव्हाण चौकापर्यंत मादाम कामा रोड बंद ठेवण्यात येणार आहे. बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग व विनय शहा मार्गही वाहतुकींसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतुक पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहेत.






कोस्टल मार्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वरील सर्व मार्गांवर वाहने उभी करण्यास रुग्णावाहिका, पोलिसांची वाहने, अग्निशमन दला व अतिमहत्त्वााच्या व्यक्तीची वाहने वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.  सायंकाळी पाच नंतर आयोजीत शोभायात्रेसाठी पोलीस वानखेडे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहे. या शोभयात्रे निमित्त पाच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या चाहत्यांनी रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


तसेच शोभयात्रेत सहभागी होण्यासाठी 4.30 वाजण्यापूर्वी मरीनड्राईवह येथे सहभागी व्हावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वानखडे स्टेडिअमच्या आतही विजयीशोभयात्रा होणार आहे. त्यासाठी चाहत्यांनी सहा वाजताच्या आत वानखडे स्टेडिअम मध्ये प्रवेश करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेय.