India Vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया चषक 2023 मध्ये टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तानमध्ये सध्या पावसाचंच पारडं जड असल्याचं पाहायला मिळत आहे. आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांपैकी कोणीच नाही, तर पाऊसच जिंकतोय, असं म्हटलं तरी चालेल. सलग दुसऱ्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात पावसानं बाजी मारली आणि सामना रद्द झाला. एवढंच नाहीतर पावसामुळे इंडिया विरुद्ध पाकिस्तान या हायव्होलटेज सामन्याकडे डोळे लावून बसलेल्या क्रिडाचाहत्यांचा हिरमोड झाला. पण याची काळजी आधीपासूनच घेण्यात आल्यामुळे आज पुन्हा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया-पाकिस्तानच्या सामन्यासाठी आज रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील सामना आज रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळवण्यात येणार आहे. 


टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमधील दुसरा सामना रविवारी (10 सप्टेंबर) कोलंबो येथे खेळवण्यात आला, परंतु पुन्हा एकदा पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकलेला नाही. टीम इंडिया टॉस हरली अन् सर्वात आधी फलंदाजीसाठी मैदानात उतरली. पण केवळ 24.1 षटकं झाली आणि पावसानं हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला. रविवारी मुसळधार पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला होता. त्यामुळे आता सामना रिझर्व्ह डेच्या दिवशी म्हणजेच, सोमवारी (11 सप्टेंबर) रोजी पूर्ण होईल. 


टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानसाठी आज रिझर्व्ह डे 


सर्वात आधी फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघानं 24.1 षटकांत 2 विकेट्स गमावत 147 धावा केल्या. आता रिझर्व्ह डेच्या दिवशी भारतीय क्रिकेट संघ या धावसंख्येसह खेळायला मैदानात उतरेल. मात्र सोमवारीही कोलंबोतील हवामान फारसं चांगलं नसेल असा अंदाज श्रीलंकेतील हवामान विभागानं वर्तवला आहे. Accuweather नुसार, या दिवशी पावसाची शक्यता 99 टक्के आहे. म्हणजेच, आजही सामना होण्याची शक्यता अजिबातच नाही, असं म्हटलं जात आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यताही 95 टक्के आहे. वाऱ्याचा वेग 41 किमी/तास असेल. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.






कोलोंबोमध्ये सोमवारी वातावरण कसं असेल? 


कमाल तापमान : 29 अंश सेल्सिअस
किमान तापमान : 25 अंश सेल्सिअस
पाऊस येण्याची शक्यता : 99 टक्के 
ढगाळ वातावरणाची शक्यता : 95 टक्के 
वाऱ्याचा वेग : 41 km/h


रिझर्व्ह डेच्या दिवशी पाऊस पडला तर काय होईल?


टीम इंडिया रिझर्व्ह डे (11 सप्टेंबर) टीम इंडिया 24.1 षटकांच्या पुढे खेळण्यासाठी मैदानात उतरेल. पण हवामान पाहता चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की, हा सामना होणार का? रिझर्व्ह डेलाही पावसानं गोंधळ घातला आणि सामना झालाच नाहीतर काय होईल? मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर रिझर्व्ह डेच्या दिवशीही पावसानं हजेरी लावली आणि सामना खेळवला गेलाच नाही, तर मात्र सामना रद्द केला जाईल. अशातच दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण दिला जाईल. 


नियमांनुसार, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामन्याचा निकाल देण्यासाठी दोन्ही डावांमध्ये किमान 20-20 षटकं खेळवली जाणं गरजेचं आहे. म्हणजेच, रिझर्व्ह डेच्या दिवशी जर पाऊस आलाच, तर सामन्याचा निकाल काढण्यासाठी पाकिस्तानला किमान 20 षटकं खेळवण्यासाठी प्रय्तन केला जाईल. त्यानंतरच डकवर्थ लुईस नियमानुसार, निकाल काढला जातो. पाकिस्तान टीम 20 ओव्हर्सही खेळू शकली नाही, तर मात्र सामना थेट रद्द केला जाईल.