IND vs PAK Asia Cup 2023 LIVE : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात वारंवार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. सामना पुन्हा सुरु होणार, अशी शक्यता होती. त्याचवेळी वरुणराजाने पुन्हा हजेरी लावली. अखेर पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या होत्या. सोमवारी येथूनच पुढे सामन्याला सुरुवात होणार आहे. विराट कोहली आणि केएल राहुल मैदानावर आहेत. गिल आणि रोहित शर्मा यांनी दमदार फलंदाजी करत अर्धशतके ठोकली. 






राखीव दिवशीही पावसाची शक्यता - 


आज पावसामुळे भारत आणि पाकिस्तान सामना थांबवावा लागला. आता राखीव दिवशी म्हणजे, सोमवारी सामना होणार आहे. पण सोमवारीही कोलंबोमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोलंबोमध्ये सोमवारी 70 टक्के पावसाची शक्यता आहे. सोमवारीही सामना झाला नाही तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. 






गिल-रोहितने घेतला पाकिस्तानच्या गोलंदजांचा समाचार - 


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी बाबरचा निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 100 चेंडूत 121 धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने 49 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर गिल याने 52 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने 10 चौकार लगावले. आजच्या दिवशाचा सामना थांबला तेव्हा विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर फलंदाजी करत होते. भारतीय संघाने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या आहेत. उद्या, सोमवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उर्वरित सामना होणार आहे. आज खेळ जिथे संपला तेथूनच सामन्याला उद्या सुरुवात होणार आहे. 


पाकिस्तानच्या फखर जमान याने मनं जिंकली


मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागलाय. यात अचानक पाकिस्तानचा स्टार खेळाडू फखर जमान अचानक सोशल मीडियावर व्हायरल झालाय. खेळपट्टी आणि मैदानावर कव्हर्स टाकण्यासाठी फखार जमान याने मैदानाच्या कर्मचाऱ्यांची मदत केली. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाले. दरम्यान, पावसामुळे सामना थांबेपर्यंत भारताने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी कोलंबोत पावसाचे वातावरण नव्हते. भारतीय संघाने 24 षटके फलंदाजी केल्यानंतर मुसळधार पावसाने सुरुवात केली. वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केल्यानंतर ग्राऊंड स्टाफने धावत येत मैदानावर कव्हर्स टाकले. त्या कर्मचाऱ्यांना पाकिस्तानचा खेळाडू फखार जमान याने मदतीचा हात दिला. कव्हर्स वजनाने जड असतात त्यामुळे ओढताना मेहनत घ्यावी लागते, फखर जमान त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावला. फखर जमान याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानचे चाहते फखरचे कौतुक करत आहेत.