IND vs PAK Asia Cup 2023 :  श्रीलंकेत सुरु असलेला आशिया कपमध्ये (Asia Cup) रविवार (10 सप्टेंबर) रोजी खेळवण्यात आलेला भारत (India) आणि पाकिस्तानचा (Pakistan) सामना पावसामुळे अपूर्ण राहिला. तर हा सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवार (11 सप्टेंबर) रोजी खेळवण्यात येईल. पण या राखीव दिवशीच्या सामन्यावर देखील पावसाचं सावट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राखीव दिवशीही हा सामना झाला नाही तर काय होणार हा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. 


राखीव दिवशी होणार सामना


भारत आणि पाकिस्तान दरम्यान रविवार (10 सप्टेंबर) रोजी दुसरा सामना खेळवण्यात आला. परंतु पावसामुळे हा देखील खेळ रद्द करावा लागला. भारत आणि पाकिस्तानच्या पहिल्याच सामन्यावेळी पावसाचं संकट ओढावलं. त्याचवेळी फक्त भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यासाठी राखीव दिवस देण्यात आला. त्यामुळे हा सामना आता राखीव दिवशी होणार आहे. राखीव दिवशी पूर्ण 50 षटकांचा सामना होईल. आजच्या दिवशीच्या समान्यामध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण 24.1 षटकावेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोमवार (11 सप्टेंबर) रोजी हा सामना याच षटकापासून सुरु होईल आणि भारत फलंदाजी करेल. 


राखीव दिवशी देखील सामना नाही झाला तर?


हा सामना राखीव दिवशी जरी होणार असला तरी या सामन्यावर देखील पावसाचं सावट असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना राखीव दिवशी तरी पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण जर राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी देखील हा सामना नाही झाला तर दोन्ही संघाला प्रत्येक एक गुण देण्यात येईल. 


दुसऱ्या भारत पाकिस्तान सामन्याची स्थिती


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी बाबरचा निर्णय चुकीचा ठरवला.शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानाच्या खेळी उत्तर दिलं. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 100 चेंडूत 121 धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने 49 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर गिल याने 52 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने 10 चौकार लगावले. आजच्या दिवशाचा सामना थांबला तेव्हा विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर फलंदाजी करत होते. भारतीय संघाने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या आहेत.