Team India Squad T20 World Cup : टी 20 विश्वचषकाचा रनसंग्राम एक जूनपासून सुरु होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये महासंग्राम पार पडणार आहे. यूनायटेड स्टेट्स आणि कॅनडा यांच्यामध्ये टी 20 विश्वचषकाचा पहिला सामना होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया विश्वचषकात उतरणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडसोबत पाच जून रोजी रंगणार आहे. भारतीय संघातील खेळाडू सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. आयपीएलनंतर आठवडाभरात टी 20 विश्वचषकाचा रनसंग्राम होणार आहे. टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 10 खेळाडूंची नावं निश्चित झाल्याचं समजतेय. रोहित शर्मासोबत जसप्रीत बुमराह टी 20 विश्वचषकात खेळणार आहे. 
 
विराट कोहली आणि रोहित शर्मा विश्वचषकात सलामीला खेळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. रोहित शर्मानं टी 20 विश्वचषकासंदर्भात राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांच्याशी चर्चा केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण रोहित शर्मानं या सर्व चर्चेचं खंडन केले आहे. पण सध्याची कामगिरी पाहाता टीम इंडियातील काही खेळांना विश्वचषकासाठी स्थान निश्चित मानलं जातेय. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचं स्थान निश्चित आहे. दोन्ही खेळाडूंनी विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. रोहित शर्मानं फलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे, तर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहनं भेदक मारा केला आहे. त्याशिवाय विराट कोहलीने खोऱ्यानं धावा चोपल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. विराट कोहलीचं विश्वचषकातील स्थानही निश्चित मानलं जातेय. 


हार्दिक पांड्या सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे, त्याला गोलंदाजीमध्ये अन् फलंदाजीमध्ये अद्याप यश मिळालं नाही. पण हार्दिक पांड्यामुळे टीम इंडिया संतुलित होते. त्यामुळे हार्दिक पांड्याचं टीम इंडियातील स्थान निश्चित मानले जातेय. हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये परतल्यानंतर टीम इंडियासाठी बोनस ठरणार आहे. विकेटकीपर फलंदाज म्हणून ऋषभ पंत याला स्थान मिळण्याची शक्यता आहे. पंतने सात सामन्यामध्ये 210 धावा चोपल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. पंतसोबत दुसऱ्या विकेटकीपरची निवड करण्यात येईल. 


स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू रवींद्र जाडेजा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांना टी 20 विश्वचषकासाठी संघात स्थान मिळेल. भारतीय संघाचा टी 20 विश्वचषकातील दुसरा सामना पाकिस्तानसोबत 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. 


या 10 खेळाडूचं टीम इंडियातील स्थान निश्चित - 


रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या