नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) म्हणजेच आयपीएलमधील 32 मॅचेसचा टप्पा पूर्ण झाला आहे. आयपीएल सुरु होऊन एका महिन्याचा कालावधी पूर्ण होत आलेला आहे. आयपीएल 2024 चा रोमांच वाढत असताना काही खेळाडू जखमी झाल्यानं संघाबाहेर जात आहेत. काही संघांमध्ये नव्या खेळाडूंची एंट्री होत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) डेवॉन कॉन्वे (Devon Conway) जखमी झाल्यानं आयपीएलबाहेर गेला आहे. आयपीएलकडून याला दुजोरा देण्यात आली असून चेन्नई सुपर किंग्जनं इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला संघात घेतलं आहे.  


रिचर्ड ग्लीसनला चेन्नई सुपर किंग्जनं बेस प्राइस 50 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल 2024 च्या उर्वरित काळासाठी रिचर्ड ग्लीसनला संघात घेतल्याची माहिती आयपीएलकडून देण्यात आली आहे. ग्लीसननं सहा टी-20 मॅचमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ग्लीसननं यामध्ये 9 विकेट घेतल्या आहेत.याशिवाय ग्लीसननं 90 टी-20 मॅच खेळल्या असून त्यानं 101 विकेट घेतल्या आहेत. 


डेवॉन कॉन्वे आयपीएलबाहेर


डेवॉन कॉन्वे आयपीएलच्या अंतिम टप्प्यात चेन्नई सुपर किंग्जमध्ये पुन्हा सहभागी होईल, अशी आशा होती. 2023 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. डेवोन कॉन्वेच्या अंगठ्याला दुखापत झाल्यानं डेवॉन कॉन्वे संघाबाहेर गेला आहे.  


रिचर्ड ग्लीसननं नुकतीच ILT 20 च्या दुसऱ्या सत्रात गल्फ जाएंटससाठी चांगली कामगिरी केली होती.  जाएंटससाठी 5 मॅचमध्ये 5 विकेट घेतल्या आहेत. ग्लीसनला संघात घेण्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जनं आणखी एक विचार केला आहे ते म्हणजे मुस्तफिजूर रहमान पुन्हा बांगलादेशच्या टीममध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळं चेन्नईनं एक बॉलर संघात घेतला आहे. मुस्तफिजूर रहमाननं 5 मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या. मुस्तफिजूर रहमान 2 मे पर्यंत सीएसकेसोबत असेल. 


डेवॉन कॉन्वेला चेन्नई सुपर किंग्जनं 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये संघात घेतलं होतं. चेन्नई सुपर किंग्जचा तो महत्त्वाचा फलंदाज राहिलेला आहे. डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी चेन्नईच्या डावाची सुरुवात करताना चेन्नई सुपर किंग्ज साठी चांगली कामगिरी केली आहे. कॉन्वेनं चेन्नई सुपर किंग्जनं 23 मॅचमध्ये 924 धावा केल्या आहेत. कॉन्वेनं 9 अर्धशतकं झळकावली असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 92 इतकी होती.  


कॉन्वे यानं गेल्या 16 मॅचमध्ये 51 च्या सरासरीनं आणि 140 च्या स्ट्राइक रेटनं 671 धावा केल्या होत्या. डेवॉन कॉन्वेनं संघात नसल्यानं त्याच्या जागी रचिन रविंद्रला संधी मिळाली आहे.  


संबंधित बातम्या : 


IPL 2024 : इम्पॅक्ट प्लेअरमुळं कुणावर अन्याय होतोय, रोहित शर्मानं खेळाडूंची नावं सांगितली, म्हणाला..


Rohit Sharma : विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग करणार का? रोहित शर्मानं खरं काय ते सगळं सांगून टाकलं