Team India Test Records 2021 : पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत भारतीय संघाने 2021 वर्षाचा शेवट गोड केला. भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने सेंच्युरियन कसोटी सामन्यात 113 धावांनी विजय मिळवला. 2021 वर्ष भारतीय गोलंदाजांसाठी भरभराटीचे राहिले आहे. या वर्षात भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना नाकीनऊ आणलं. 2021 मध्ये कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी 250 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय संघ ठरला. वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा (WTC) अपवाद वगळता प्रत्येक मालिकेत भारतीय संघाने आपला दबदबा राखला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडला त्यांच्याच मैदानावर पराभूत केलं, यामध्ये भारतीय गोलंदाजांना मोलाचा वाटा होता. अनेक वर्षांपासून फलंदाजी भारतीय संघाची जमेची बाजू मानली जात होती. मात्र, 2021 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. घरच्या मैदानावर विदेशातही भारतीय गोलंदाजांनी आपला डंका वाजवला.  


कुणी घेतल्या सर्वाधिक विकेट?
2021 मध्ये भारतीय गोलंदाजांनी कसोटीमध्ये अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी मिळून 252 विकेट घेतल्या आहेत. 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्यात भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये भारताकडून आर. अश्विन याने सर्वाधिक विकेट घेतल्या. अश्विनने 50 पेक्षा जास्त फलंदाजांना बाद केलं. मोहम्मद सिराजने 31 आणि जसप्रीत बुमराह याने 30 विकेट मिळवल्या आहेत. मोहम्मद शमीच्या नावावर 23 विकेट आहेत. तर फिरकीपटू अक्षर पटेल याने 36 विकेट घेतलया आहेत. वर्षभराच्या कामगिरीवर नजर मारल्यास भारतीय गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केलं आहे.  


कोणत्या संघाने घेतल्या सर्वाधिक विकेट?
2021 मध्ये भारतीय संघाने कसोटीत 252 विकेट घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या संघामध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. भारतीय संघाने 14 सामन्यात 252 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंड संघाने 15 सामन्यात 229 विकेट घेतल्या आहेत. तर 161 विकेट घेत वेस्ट इंडिंज तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तान संघाने 153 विकेट्स घेतल्या आहेत.  


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live