नवी दिल्ली: ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या यंदाच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत दाखल झाला. यावेळी दिल्ली विमानतळाबाहेर विश्वविजेत्या (T 20 World Cup 2024) टीम इंडियातील खेळाडुंना पाहण्यासाठी दिल्लीकरांनी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती. यानंतर भारतीय संघाचे (Team India) खेळाडू काही काळ आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबले होते. काही काळ विश्रांती केल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू हे 7 लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या निवासस्थानी गेले. तब्बल दीड तास भारतीय खेळाडुंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.
यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीम इंडियाची जर्सी भेट देण्यात आली. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांच्याकडून NAMO 1 असे लिहलेली जर्सी पंतप्रधान मोदी यांना भेट देण्यात आली. या जर्सीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही जर्सी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत नरेंद्र मोदींनी मारल्या गप्पा
भारतीय खेळाडुंनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर काहीवेळात एक व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला. या व्हीडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व भारतीय खेळाडुंशी गप्पा मारताना दिसत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल यांच्यासोबत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही मोदींनी गप्पा मारल्या. या सगळ्यांनी पंतप्रधान मोदी यांना विश्वचषक स्पर्धेतील अनुभव सांगितले.
मुंबईत भारतीय संघाचे जंगी स्वागत
पंतप्रधान मोदी यांना भेटून टीम इंडिया मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. मुंबईत विश्वविजेत्या भारतीय संघाच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन डेक बसमधून भारतीय खेळाडुंची विजययात्रा निघणार आहे. त्यासाठी मरिनड्राईव्ह आणि वानखेडे मैदानावर आतापासूनच क्रिकेटप्रेमींची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. वानखेडे मैदानात आल्यानंतर भारतीय संघावर 125 कोटी रुपयांच्या बक्षिसाची लयलूट करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तमाम क्रिकेटप्रेमींचे डोळे मुंबईतील सेलिब्रेशनकडे लागले आहेत.
आणखी वाचा
टीम इंडियाची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?; फोटो अन् कॅप्शनने वेधलं लक्ष
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
गळ्यात विजयी मेडल...विराट कोहलीने दिल्ली विमानतळाबाहेर येताच काय केलं?; पाहा Video