मुंबई: रोहित शर्माच्या भारतीय संघानं (Team India) 2023 या कॅलेंडर वर्षात कमालीची कामगिरी बजावली. भारतानं तिन्ही फॉरमॅट्सच्या रॅन्किगमध्ये नंबर वन पटकावला. पण आयसीसीसा वन डे विश्वचषक असो, किंवा जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल भारतीय संघाला सर्वोच्च यशानं हुलकावणी दिली. त्यामुळं भारतीय क्रिकेटरसिकांची नजर आता पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर लागली आहे.


क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश


आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं 2028 सालच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. यजमान समितीन शिफारस केलेल्या पाच नव्या क्रीडाप्रकारांच्या यादीत क्रिकेटचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. वास्तविक ऑलिम्पिकसाठी क्रिकेटचा खेळ नवा नाही. याआधी 1900 साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. त्यानंतर तब्बल 128 वर्षांनी क्रिकेटचं ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होतंय. भारतासह दक्षिण आशियाई आणि राष्ट्रकुलातल्या देशांमध्ये क्रिकेटची असलेली लोकप्रियता ही त्यासाठी निर्णायक ठरली असावी.


भारताची विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक


रोहित शर्माच्या भारतीय संघानं वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये मारलेली धडक ही भारतीय क्रिकेटसाठी दुसरी टॉप इव्हेण्ट ठरली. पण विश्वचषकाच्या या फायनलवर पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि भारताची वीस वर्षांनी पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी हुकली. भारतानं सलग दहा विजय मिळवून विश्वचषकाची फायनल गाठली होती. त्यामुळं भारतीय क्रिकेटरसिकांच्या अपेक्षा खूपच उंचावल्या होत्या. पण ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबूशेन या जोडीनं भारतीय क्रिकेटरसिकांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. त्यांनी ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये सहा विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. वन डे विश्वचषक जिंकण्याची ऑस्ट्रेलियाची ही सहावी वेळ ठरली.


विराट कोहलीचं वन डे शतकांचं अर्धशतक


विराट कोहलीनं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीत झळकावलेलं शतकांचं अर्धशतक ही भारतीय क्रिकेटसाठी तिसरी टॉप इव्हेण्ट ठरली. हा विराट पराक्रम गाजवताना सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक 49 वन डे शतकांचा विक्रम त्यानं इतिहासजमा केला. विशेष म्हणजे विराटनं सचिन तेंडुलकरच्या माहेरघरात म्हणजे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, साक्षात मास्टर ब्लास्टरच्या उपस्थितीत हा पराक्रम गाजवला. या कामगिरीसाठी सचिननंही खुल्या दिलानं विराटचं कौतुक केलं आणि त्याला शाबासकीही दिली.


विराटचा विश्वचषकात धावांचा धबधबा


ऑस्ट्रेलियाच्या निर्विवाद कामगिरीनं भारताची तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी हुकली, पण या विश्वचषकातल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान विराट कोहलीच्या जणू नावावरच झाला होता. तीच ठरली भारतीय क्रिकेटसाठी चौथी टॉप इव्हेण्ट. विराट कोहलीनं विश्वचषकातल्या 11 सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक 765 धावांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यानं एका विश्वचषकातल्या सर्वाधिक धावांच्या शर्यतीत पुन्हा सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकलं. सचिन तेंडुलकरचा 2003 सालच्या विश्वचषकातला सर्वाधिक 673 धावांचा विक्रम त्यानं आपल्या नावावर केला. यंदाच्या विश्वचषकात तीन शतकं आणि सहा अर्धशतकांसह घातलेला 765 धावांचा रतीब विराट कोहलीच्या लौकिकात आणखी भर घालणारा ठरला.


कानामागून आला, शमी तिखट झाला


यंदाच्या विश्वचषकात गोलंदाज म्हणून भारतासाठी विराट कामगिरी बजावली ती मोहम्मद शमीनं. पहिल्या चार सामन्यांमध्ये संधीही न मिळालेल्या शमीनं केवळ सात सामन्यांमध्ये मिळून 24 फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळं त्याची कामगिरी कानामागून आला आणि तिखट झाला या श्रेणीत मोडणारी ठरली. हार्दिक पंड्याला झालेल्या दुखापतीनं शमीला भारतीय संघाचं दार खुलं झालं. त्यानं वयाच्या 33व्या वर्षी भारतीय खेळपट्ट्यांवर अक्षरश: आग ओकली. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत 57 धावांत सात विकेट्स आणि विश्वचषकात 24 विकेट्स ही त्याची कामगिरी भारताच्या विश्वचषक इतिहासात सर्वोत्तम ठरली. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शमीची पाठ थोपटली. तीच ठरली भारतीय क्रिकेटसाठी पाचवी टॉप इव्हेण्ट.


जागतिक कसोटी विजेतेपदाची भारताला पुन्हा हुलकावणी


वन डे विश्वचषकाच्या फायनलआधी जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलमध्येही ऑस्ट्रेलियानं रोहित शर्माच्या भारतीय संघाला यशाची चव चाखू दिली नाही. पण भारतीय संघानं गाठलेली फायनल ही भारतीय क्रिकेटसाठी कॅलेंडर वर्षातली सहावी टॉप इव्हेण्ट ठरली.लंडनच्या ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी धुव्वा उडवला. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथनं पहिल्या डावात झळकावलेली शतकं, तसंच त्या दोघांनी रचलेली 285 धावांची भागीदारी कसोटी विजेतेपदाच्या फायनलमध्ये निर्णायक ठरली.


भारताला आशिया चषकाचा मान


रोहित शर्माच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवून आशिया चषकाच्या फायनलवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. फायनलच्या रणांगणात भारतानं श्रीलंकेचा अख्खा डाव 50 धावांत गुंडाळून खरोखरच कमाल केली. मोहम्मद सिराजनं सहा आणि हार्दिक पंड्या तीन विकेट्स काढून श्रीलंकेला डोकं वर काढण्याची संधीही दिली नाही. यंदाच्या कॅलेंडर वर्षात भारतीय क्रिकेटसाठी ही सातवी टॉप इव्हेण्ट ठरली.


एशियाडमध्ये भारताला क्रिकेटची दोन्ही सुवर्णपदकं


एशियन गेम्समधलं क्रिकेटचं पदार्पण भारतानं दोन्ही सुवर्णपदकांची कमाई करून गाजवलं. भारतीय महिलांनी श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करून आपल्या गटात सुवर्णपदक पटकावलं. स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिक्सनं फलंदाजीत, तर टिटास साधूनं गोलंदाजीत बजावलेली कामगिरी भारतासाठी निर्णायक ठरली. पुरुष गटात भारत आणि अफगाणिस्तान संघांमधल्या फायनलवर पाणी फेरलं. मग आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी रॅन्किंगच्या निकषावर भारताला सुवर्णपदकाचा मान देण्यात आला. यंदाच्या कॅलेंडर वर्षात एशियन्स गेम्समधली ही कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी आठवी टॉप इव्हेण्ट ठरली.


भारतीय महिलांनी गाजवलं कसोटीचं मैदान


भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्सनी मात करून मुंबईत ऐतिहासिक कसोटी विजय साजरा केला. भारताचा हा ऑस्ट्रेलियावरचा पहिलाच कसोटी विजय ठरला. त्याआधी, भारतीय महिलांनी नवी मुंबईतल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर तब्बल 347 धावांनी प्रचंड विजय साजरा केला. महिला क्रिकेटच्या इतिहासात तो सर्वात मोठा कसोटी विजय ठरला. यंदाच्या कॅलेंडर वर्षात भारतीय महिलांची कसोटी सामन्यांमधली ही कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी नववी टॉप इव्हेण्ट ठरली.


धोनीच्या चेन्नईला आयपीएलचं पाचवं विजेतेपद


धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएलचं पाचवं विजेतेपद पटकावून मुंबई इंडियन्सच्या कामगिरीशी बरोबरी साधली. या आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईनं गुजरात टायटन्सचा पाच विकेट्सनी पराभव केला. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात चेन्नईला विजयासाठी 13 चेंडूंत 22 धावांची गरज होती. रवींद्र जाडेजानं सहा चेंडूंत एक चौकार आणि एका षटकारासह नाबाद 15 धावा ठोकून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. यंदाच्या कॅलेंडर वर्षात रवींद्र जाडेजाची ती कामगिरी आणि चेन्नईचं पाचवं आयपीएल विजेतेपद भारतीय क्रिकेटमधली ही दहावी टॉप इव्हेण्ट ठरली.


2023 या कॅलेंडर वर्षानं भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च यश मिळवून दिलं नसलं, तरी भारतीय संघाची कामगिरी ही अपेक्षा उंचावणारी होती. आता 2024 या नव्या कॅलेंडर वर्षात भारतीय क्रिकेटरसिकांची नजर वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या ट्वेन्टी20 विश्वचषकावर राहील.


ही बातमी वाचा: