Gautam Gambhir India Coach: गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षकपदी भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय सुरू झाला आहे. तो सध्या टीम इंडियासोबत (Team India) श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंकेत (India vs Sri Lanka) तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. पण या सगळ्या दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटर तन्वीर अहमदने गौतम गंभीरवर संगनमताने आणि राजकारणातून मुख्य प्रशिक्षकपद मिळवल्याचा आरोप केला आहे. 


गौतम गंभीरपेक्षा व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकपदासाठी अधिक पात्र होता, असा दावा तन्वीर अहमदने केला आहे. भारतात 'पर्ची' चा अर्थ 'पावती' असा समजला जातो, पण पाकिस्तानमध्ये 'पर्ची' म्हणजे फसव्या मार्गाने किंवा काही संबंधाच्या आधारे काही काम करून घेणे. त्यामुळे सोप्या भाषेत समजले तर गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक होण्याचा अधिकार नाही आणि इतर संबंधांच्या जोरावर त्याने हे पद मिळवले, असा आरोप तन्वीर अहमदने केला आहे. 


व्हीव्हीएस लक्ष्मण दीर्घकाळापासून भारत ब संघाशी संबंधित-


नॅशनल क्रिकेट अकादमीचे (NCA) संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण दीर्घकाळापासून भारत ब संघाशी संबंधित आहेत. गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले तेव्हा ते संघाचे प्रशिक्षक होते. व्हीव्हीएस लक्ष्मणने नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यातही टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वेचा 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 4-1 ने पराभव केला.


गौतम गंभीर पुढं कोणतं लक्ष्य?


भारतीय क्रिकेट संघानं आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोनवेळा प्रवेश केला होता. दोन्ही वेळा भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं. आता तिसऱ्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचं टीम इंडियाचं धोरण आहे. या विजेतेपदाच्या अनुषंगानं टीम इंडियाची बांधणी करणं आणि विजेतेपद खेचून आणणं ही गौतम गंभीरवर  जबाबदारी असेल. भारतानं 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा जिंकवणं देखील गौतम गंभीर पुढं आव्हान असेल. 


श्रीलंकेत पोहचताच गौतम गंभीर अॅक्शन मोडमध्ये-


गौतम गंभीर श्रीलंकेत पोहोचताच ॲक्शनमध्ये आला असून बीसीसीआयने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. सदर व्हिडीओमध्ये गौतम गंभीर संजू सॅमसनला फलंदाजीच्या काही टिप्स देताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. झिम्बाब्वेविरोधात संजू सॅमसनने  2 डावात अर्धशतकासह 70 धावा केल्या.बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचे सराव सत्र दाखवण्यात आले आहे. यावेळी गौतम गंभीर संजू सॅमसनला फलंदाजीबाबत काही गुरुमंत्र देताना दिसला. गौतम गंभीर सॅमसनला ऑफ साईडमध्ये खेळण्याच्या पद्धतीबद्दल काहीतरी सांगत आहेत.


संबंधित बातमी:


भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार टी-20 अन् वनडे मालिका; सामने कुठे बघता येणार?, जाणून घ्या A टू Z माहिती