AFG vs NZ: अफगाणिस्तान क्रिकेट संघाला (Afganistan Cricket Team) जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) त्याला मदत करण्यास तयार असते. आता अफगाणिस्तानचा संघ सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जाईल. बीसीसीआयने ग्रेटर नोएडा, कानपूर आणि लखनौला अफगाणिस्तान संघाचे होम ग्राऊंड म्हणून घोषित करणार असल्याची माहिती बातमी समोर आली आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट सुरू झाली, तेव्हा बीसीसीआय हे अफगाण संघाला पाठिंबा देणारे पहिले क्रिकेट बोर्ड होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच अफगाणिस्तान संघासाठी ग्रेटर नोएडा, कानपूर आणि लखनौ या तीन घरच्या मैदानांची घोषणा करू शकते. तालिबान राजवट सुरू झाल्यानंतर चार वर्षांनी अखेर बीसीसीआयने अफगाणिस्तानचे सामने भारतात आयोजित करण्यास परवानगी दिली आहे.
ऑस्ट्रेलियाने तीन वेळा खेळण्यास दिला नकार-
तालिबान सरकार आल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध तीनदा खेळण्यास नकार दिला आहे. महिलांना खेळांमध्ये सहभागी होण्यापासून रोखणाऱ्या तालिबानच्या धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ही भूमिका घेतल्याचे जाहीर केले होते. पण ऑस्ट्रेलियाचा शेजारी देश न्यूझीलंडने हा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवत अफगाणिस्तानशी खेळण्यास होकार दिला आहे.
तीव्र उष्णतेमुळे मालिका पुढे ढकलली-
याआधी अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्ध मालिका खेळणार होता. ही मालिका देखील भारतातच होणार होती. पण त्यावेळी उत्तर भारतात तीव्र उष्णतेमुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली होती. या दौऱ्यात अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 2 कसोटी सामने आणि वनडे आणि टी-20 चे सामना खेळणार आहे.
देशात एकही क्रिकेटचे मैदान नाही-
राजकीय अस्थिरता आणि युद्धाच्या भीषणतेचा सामना करणाऱ्या आणि सरावासाठी स्वतःचे मैदानही नसलेल्या देशाच्या संघाने टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली. क्रिकेटच्या पायाभूत सुविधा नाहीत. काबूलमध्ये एकच जागतिक दर्जाचे मैदान आहे. मात्र आतापर्यंत येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. भारत हे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे दुसरे घर आहे. सध्या अफगाणिस्तानचा संघ दुबईतील शारजात सराव करतो.
भारताचा पाठिंबा निर्णायक ठरला-
अफगाणिस्तानमध्ये गेल्या दोन दशकांत क्रिकेटची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. आता क्रिकेट हा तिथे सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ आहे. अफगाणिस्तान जिंकला की देशात उत्सवासारखे वातावरण असते. क्रिकेट न समजणारे लोकही अफगाणिस्तानचा झेंडा फडकताना बघण्यासाठी क्रिकेटची मॅच बघत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या प्रवासात भारत आणि बीसीसीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अफगाणिस्तानला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवून देण्यात भारताचा पाठिंबा निर्णायक ठरला होता. अफगाणिस्तान क्रिकेट संघाने झपाट्याने प्रगती केली आहे. 2010मध्ये पहिल्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी हा संघ पात्र ठरला होता.