T20 World Cup: टी-20 विश्वचषकाच्या गट-1 मधून इंग्लंडने आपले 4 सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. या गटातील दुसरा संघ कोण असेल? याचं उत्तर आज होणाऱ्या 2 सामन्यांवरून स्पष्ट होईल. आजच्या दोन सामन्यांमध्ये प्रत्येकी एक संघ असा आहे, ज्यांना उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी जिंकणे आवश्यक आहे. अशा स्थितीत दोन्ही सामने पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज-श्रीलंका आमनेसामने असतील. बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ आधीच विश्वचषकातून बाहेर पडले आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश: ऑस्ट्रेलिया पराभूत झाली तर?
ऑस्ट्रेलिया आपल्या 3 पैकी 2 सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत त्याचा प्रमुख प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेने 4 पैकी 3 सामने जिंकले असून गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा नेट रन रेटही ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला आहे.
उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. एकही सामना गमावला तर त्यांना दक्षिण आफ्रिका-इंग्लंड सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. आफ्रिकेचा इंग्लंडकडून पराभव झाल्यास नेट रन रेटच्या आधारावर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले जाईल. दुसरीकडे या सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडिजकडून पराभूत झाला तर विश्वचषकातून बाहेर पडेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश: ऑस्ट्रेलिया जिंकला तर?
ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यास त्यांना कोणत्याही संघावर अवलंबून राहावे लागणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धचा पुढील सामना जिंकून ते उपांत्य फेरीचा मार्ग निश्चित करू शकतात. मात्र, दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पुढील सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यास पुन्हा उपांत्य फेरीसाठी संघ नेट रन रेटच्या आधारे निवडला जाईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका: वेस्ट इंडिज पराभूत झाला तर?
श्रीलंकेविरुद्ध वेस्ट इंडिजचा पराभव झाला तर ते विश्वचषकातून बाहेर होतील.
वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका: वेस्ट इंडिज जिंकला तर?
श्रीलंकेविरुद्ध विजयाची नोंद करून वेस्ट इंडिज आपल्या आशा जिवंत ठेवू शकेल पण त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा सामनाही जिंकावा लागेल. एवढेच नाही तर त्याला दोन्ही सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील जेणेकरून त्याचा नेट रन रेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगला होऊ शकेल. त्याचबरोबर इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याची प्रार्थनाही करावी लागेल.