IND vs AFG: टी 20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पहिल्या दोन पराभवानंतर काल अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने निर्धारित 20 षटकात 210 धावांचा पाऊस पाडला. या सामन्यामध्ये धावांच्या पावसासह विक्रमांचा देखील पाऊस पडला. 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 144 धावाच करू शकला. भारताचे रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनी जबरदस्त सुरुवात केली. राहुलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 69 धावा केल्या. तसेच रोहितने 47 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. या दोघांनी 140 धावांची सलामी भागीदारीही रचली.
सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारीदरम्यान दोघांनी एका विक्रमाला गवसणी घातली. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 140 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यान या दोघांनी वैयक्तीक अर्धशतकं केली. टी20 विश्वचषक स्पर्धेत एकाच सामन्यात दोन्ही भारतीय सलामीवीरांनी अर्धशतक ठोकण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 2007 सालच्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्यावेळी डर्बनला झालेल्या या सामन्यात सेहवागने 68 धावांची आणि गंभीरने 58 धावांची भागीदारी केली होती.
विश्वचषकात भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा आणि केएल राहुल पहिल्या स्थानावर पोहोचले. या यादीत दुसऱ्या स्थानावर विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर आहेत. त्यांनी 2007 साली इंग्लंडविरुद्ध 136 धावांची भागीदारी केली होती. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्ध 106 धावांची भागीदारी केली होती.
सलामीवीर रोहित शर्माला उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. रोहितला त्याच्या शानदार 74 धावांच्या खेळीमुळं सामनावीर पुरस्कार मिळाला. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार मिळण्याची त्याची ही अकरावी वेळ आहे. रोहित या सामन्यात मिळालेल्या या पुरस्कारानंतर आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेल्या पहिल्या पाच खेळाडूंमध्येही सहभागी झाला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीनं सर्वाधिक 13 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. तर भारताच्या विराट कोहलीनं 12 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
रोहित शर्माने टी 20 विश्वचषक स्पर्धेत सात वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची कामगिरी केली आहे. या यादीत आता तो महेला जयवर्धनेसह तिसऱ्या स्थानी आहे. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 10 वेळा अशी कामगिरी केली आहे. ख्रिस गेलने नऊ वेळा 50 धावांचा आकडा गाठला आहे.