Team India in UAE: संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमान येथे आयोजित टी -20 विश्वचषकाचा (T20 World Cup) ब्लॉकबस्टर सामना भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan Clash) दरम्यान 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. हे दोन संघ 2 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानावर भिडतील. याआधी 2019 च्या विश्वचषकात दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी भारताने पाकिस्तानला चितपट केलं होतं.


विराट कोहली आणि बाबर आझमच्या संघाने टी20 वर्ल्ड कपची तयारी सुरू केली आहे. दोन्ही संघांनी सोमवारी पहिला सराव सामना खेळला. यात भारताने इंग्लंडचा सामना केला तर पाकिस्तानचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होता. भारताने इंग्लंडला 7 विकेटने पराभव करत आपली इरादे स्पष्ट केले. त्याचबरोबर पाकिस्ताननेदेखील टी -20 विश्वविजेता वेस्ट इंडिजचा पराभव केला. हे सामने आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये खेळले गेले.






या सराव सामन्यात टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि खेळाडूंनी पाकिस्तान संघाच्या खेळाबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर, जेव्हा टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळण्यासाठी मैदानावर पोहोचली, त्याचवेळी पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध सराव सामना खेळत होता. यादरम्यान टीम इंडियाचे खेळाडू पाकिस्तानला खेळताना पहाताना दिसले. टीम इंडियासोबत दुबईत उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान संघही इथे खेळत आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. त्यांना पाहणे हा एक चांगला अनुभव होता.


बाबर आझमची अर्धशतकी खेळी
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत, प्रशिक्षक रवी शास्त्री टीम इंडियाचा सामना भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांच्यासोबत सुरू होण्याची वाट पाहत आहेत. टीम इंडिया सामन्याची वाट पाहत होती, तेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम फलंदाजी करत होता. बाबर हा जगातील नंबर वन वनडे फलंदाज आहे आणि 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात तो भारतीय संघासाठी सर्वात मोठा धोका आहे. बाबर आझमने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यात 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने अर्धशतक झळकावले. पाकिस्तानने हा सामना 7 गडी राखून जिंकला.