T20 World Cup 2024 Team India: भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2024) फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना बार्बाडोस येथे खेळला गेला. मात्र आता मोठी माहिती समोर येत आहे. वास्तविक, असे मानले जात आहे की चक्रीवादळ बेरीलमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना भारतात परतण्यास विलंब होऊ शकतो. भारतीय संघ आज बार्बाडोसहून रवाना होणार होता, पण आता चक्रीवादळ बेरीलने नियोजन बिघडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आज देखील बार्बाडोहून भारतीय संघ भारतासाठी रवाना होण्याची शक्यता कमीच आहे. 


पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार भारतीय संघाचे खेळाडू आज न्यूयॉर्कला रवाना होणार होते. न्यूयॉर्कमधील भारतीय खेळाडूंना कनेक्टेड फ्लाइटने दुबईला जावे लागते, परंतु आता चक्रीवादळ बेरीलमुळे ते जवळजवळ अशक्य मानले जात आहे. दरम्यान, बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटली यांनी रविवारी रात्री विमानतळ बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. बार्बाडोसच्या विमानतळावरून उड्डाणांची वाहतूक बंद राहील. त्यामुळे उद्या म्हणजेच 2 जून रोजी भारतीय संघ दिल्लीत दाखल होईल, असं सांगण्यात येत आहे. 






29 जून रोजी भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. या सामन्याबद्दल बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र रोहित शर्मासह टॉप-3 फलंदाज झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताचे तीन फलंदाज 34 धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेले होते. मात्र, यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यात चांगली भागीदारी झाली. मात्र, भारतीय संघाने 20 षटकांत 7 बाद 176 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 169 धावाच करू शकला.


बीसीसीआयकडून 125 कोटी रुपयांचं बक्षीस-


बीसीसीआयने भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला बीसीसीआय 125 कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. भारतीय संघाला आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात उत्कृष्ट खेळ, प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले.


आयसीसीकडूनही बक्षीस जाहीर-


जेतेपद पटकवल्यानंतर भारतीय संघाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले. भारतीय संघासोबतच दक्षिण आफ्रिकेलाही बक्षीस मिळाले आहे. टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम 11.25 दशलक्ष डॉलर्स (93.51 कोटी) ठेवण्यात आले  होते. जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला 20.36 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. तर दक्षिण आफ्रिकेने  1.28 मिलियन डॉलर्स म्हणजेच 10.64 कोटी कमावले. 


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: जिंकला, हसला, रडला, तिरंगा रोवला; विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे अंगावर काटा आणणारे टॉप 15 फोटो


T20 World Cup 2024 Team India Prize Money: विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल; द. अफ्रिकेलाही कोट्यवधी रुपये, कोणाला किती मिळाले?


T20 World Cup 2024 Team India Celebration: विश्वचषक घेताना रोहित शर्माची अनोखी एन्ट्री; सोशल मीडियावर ट्रेंड, पाहा संपूर्ण Video