T20 World Cup 2024: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने यंदाचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकला. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. त्याचवेळी, या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला बीसीसीआय 125 कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह काय म्हणाले?
बीसीसीआयचे सचिव जय शाह ट्विटरद्वारे म्हणाले की, मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की, भारतीय संघाला आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात उत्कृष्ट खेळ, प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली. टीम इंडिया दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनली.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताचा विजय-
भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 59 चेंडूत सर्वाधिक 76 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 169 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.
आयसीसीकडूनही बक्षीस जाहीर-
जेतेपद पटकवल्यानंतर भारतीय संघाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले. भारतीय संघासोबतच दक्षिण आफ्रिकेलाही बक्षीस मिळाले आहे. टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम 11.25 दशलक्ष डॉलर्स (93.51 कोटी) ठेवण्यात आले होते. जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला 20.36 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. तर दक्षिण आफ्रिकेने 1.28 मिलियन डॉलर्स म्हणजेच 10.64 कोटी कमावले.
उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांनाही मोठं बक्षीस
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सोबतच आणखी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते. इंग्लंड आणि अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, या दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड आणि अफगाणिस्तानला बक्षीस म्हणून 6.54 कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय इतर संघांनाही बक्षीस मिळाले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहोचलेल्या प्रत्येक संघाला म्हणजेच सुपर 8 ला 3.17 कोटी रुपये मिळाले आहेत.